महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ; तब्बल 195.50 रुपयांनी महागला सिलिंडर (File Photo : LPG)
नवी दिल्ली : पश्चिम आशियात युद्ध अद्याप सुरुच आहे. त्यामुळे संपूर्ण जगाला फटका बसत आहे. इंधनाच्या किंमती वाढताना दिसत आहेत. त्यातच सरकारी कंपन्यांनी बुधवारी व्यावसायिक एलपीजीच्या दरात १९५.५० रुपयांनी वाढ केली आहे. ही वाढ १९ किलोच्या सिलिंडरसाठी आहे. मात्र, सरकारी कंपन्यांनी घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.
व्यावसायिक सिलेंडरच्या दरातील ही वाढ पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक तेल दरात झालेल्या वाढीचा थेट परिणाम आहे. नवीन दर लागू झाल्यामुळे, दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत आता २०७८.५० झाली आहे. यापूर्वी सरकारी तेल कंपन्यांनी १ मार्च रोजी १९ किलोच्या सिलेंडरच्या दरात ११४.५ ने वाढ केली होती. मात्र, सरकारने घरगुती एलपीजीच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. १४.२ किलोच्या सिलेंडरसाठी शेवटची दरवाढ ७ मार्च रोजी ६० ने झाली होती. हा सिलेंडर आता दिल्लीत ९१३ ला उपलब्ध झाला आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्या आंतरराष्ट्रीय बेंचमार्क आणि विनिमय दरांच्या आधारे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) आणि एलपीजीच्या किमती सुधारित करतात.
जागतिक तेल किमतींमध्ये वाढ
पश्चिम आशियातील युद्धामुळे ऊर्जा पुरवठा साखळीत व्यत्यय आल्याने जागतिक तेल किमती जवळपास ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. याचा परिणाम एलपीजीच्या किमतींवरही होत आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सध्या तरी स्थिर आहेत. गेल्या वर्षी मार्चमध्ये प्रति लिटर २ ची कपात झाल्यापासून हे दर स्थिर आहेत. दिल्लीत सध्या पेट्रोलची किंमत प्रति लिटर ९४.७२ आहे, तर डिझेल प्रति लिटर ८७.६२ ला विकले जात आहे. ही दरवाढ व्यवसाय आणि लहान उद्योगांसाठी चिंतेचा विषय ठरू शकते, कारण ऊर्जा खर्चातील वाढीचा त्यांच्यावर थेट परिणाम होणार आहे.
हेदेखील वाचा : AFG vs PAK War: पाकिस्तान-अफगाणिस्तान तणाव शिगेला! संरक्षणमंत्र्यांची उघड धमकी: ‘दहशतवादी हल्ला झाल्यास अफगाण तालिबानला…!’






