मुंबई: भयानक उकाड्याचा सामना करत असलेल्या लोकांना या आठवड्यात थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने असा अंदाज वर्तवला आहे की, मान्सून 4 जूनला केरळमध्ये(Monsoon Update) दाखल होणार आहे. तसेच असंही सांगण्यात आलं आहे की, मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे येत्या 2-3 दिवसांमध्ये उत्तर भारतात चांगल्या पावसाची शक्यता आहे. (Weather Update)
यावर्षी सरासरीइतका पाऊस पडेल
हवामान विभागाने सांगितलं की, मार्च ते मे महिन्यादरम्यान प्री-मान्सूनमुळे चांगला पाऊस पडेल. तसेच 1 मार्च ते 25 मे दरम्यान 12% जास्त पाऊस झाला आहे. प्री मान्सूनच्या सीझनमध्ये हिट वेव्ह कमी दिसली. हवामानतज्ञांच्या मते, एकदा का मान्सून मजबूत परिस्थितीत आला तर तो 4 जूनच्या आसपास केरळमध्ये (Kerala) दाखल होईल, अशी आम्हाला आशा आहे. ते पुढे म्हणाले की,1 जूनच्या आधी मान्सून येईल असं काही आम्हाला वाटत नाही. यावर्षी सरासरीइतका पाऊस पडेल.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा अंदाज
राज्यात उन्हामुळे नागरिकांची लाही लाही झाली होती. मुंबई आणि पुण्यात यावर्षी तापमानाने उच्चांक गाठला. मात्र, या वाढत्या उकड्यापासून लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण पुढील दोन दिवसात राज्यात काही भागात पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उत्तर ते दक्षिण असलेला कमी दाबाचा पट्टा विदर्भातून जात आहे. त्यामुळे विदर्भामध्ये पुढील 48 तासात तुरळ ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
राज्यातील कमाल तापमान पुढील 48 तासात सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र तापमान वाढण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानापासून मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. वातावरण ढगाळ राहून तुरळक भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबई आणि परिसरात पुढील पाच दिवसांत कमाल तापमानात दोन ते तीन अंशानी घट होईल. राज्यातील इतर भागातही तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. सध्या विदर्भ, मराठवाडयामधील अनेक भागांमध्ये कमाल तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे या भागांमधील नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. मात्र पुढील पाच दिवसांमध्ये इथेही तापमानात कमी होणार आहे. पुण्यात देखील पुढील काही दिवसांत वातावरण ढगाळ राहणार असल्याने तापमान कमी होण्याची शक्यता आहे. पुण्यात 25, 26 आणि 27 मे रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच 28 ते 31 मे रोजी आकाश निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळण्याची शक्यता आहे.