अहमदाबाद : गुजरात हायकोर्टाने (Gujrat High Court) मशिदींमध्ये अजान किंवा नमाजासाठी लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावली आणि ती ‘पूर्णपणे चुकीच्या गृहितकांवर आधारित’ असल्याचे म्हटले आहे. मुख्य न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध पी. मायी यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान मंदिरात आरतीच्या वेळी बाहेर घंटा आणि घुंगरांचा आवाज ऐकू येत नाही, असा दावा याचिकाकर्ता करू शकतो का? असा प्रश्नही विचारला.
बजरंग दलाचे नेते शक्तीसिंह झाला यांनी दाखल केलेल्या याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की लाऊडस्पीकरद्वारे अजानमुळे होणारे ‘ध्वनी प्रदूषण’ लोकांच्या आरोग्यावर, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम करते आणि अन्यथा गैरसोय होते. न्यायालयाने म्हटले की, आम्ही या प्रकारच्या जनहित याचिकांचा विचार करत नाही. वर्षानुवर्षे चालत आलेली आणि पाच-दहा मिनिटांसाठी घडणारी ही श्रद्धा आणि प्रथा आहे.
न्यायालयाने म्हटले की, ध्वनी प्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी एक वैज्ञानिक पद्धत आहे, परंतु याचिकेत 10 मिनिटांच्या अजानमुळे ध्वनी प्रदूषण होते हे दर्शविण्यासाठी कोणताही डेटा प्रदान केलेला नसल्याचेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.






