हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ संशयास्पद ड्रोनच्या हालचाली; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या मूळ निवासाजवळ ड्रोन उडताना दिसल्याने खळबळ उडाली आहे. सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या या घरी मुख्यमंत्र्यांच्या वयोवृद्ध मातेसह इतर कुटुंबीय वास्तव्यास आहेत. पोलिस ठाणे नादौनच्या हद्दीत येणाऱ्या गौना, सेरा आणि माझियार परिसरात एकाच वेळी चार ड्रोन दिसल्याची माहिती स्थानिक नागरिक आणि पंचायत प्रतिनिधींनी दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.
स्थानिक नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या घरातील लाइट्स बंद केल्या. करौर पंचायतचे माजी उपसरपंच संजीव कुमार आणि अमलेहड पंचायतच्या सरपंच सोनिया ठाकूर यांनी सांगितले की, हे ड्रोन सुरुवातीला सेरा गावाच्या वरून उडताना दिसले. त्यानंतर त्यातील एक गौना, एक माझियार आणि एक कोहला गावाच्या दिशेने अत्यंत वेगाने गेल्याचं सांगितलं जात आहे. स्थानिकांनी सांगितलं की, यापैकी एक ड्रोन कोसळल्याचं दिसून आलं आहे.
India Pakistan Ceasefire : युद्धबंदीची घोषणा प्रथम अमेरिकेने का केली? काँग्रेसचा केंद्र सरकारला सवाल
दरम्यान, पोलिसांकडून या घटनेची अधिकृत पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही. नादौनचे पोलिस निरीक्षक निर्मल सिंह यांनी सांगितले की, पोलिसांची टीम तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आली असून तपास सुरू आहे. हमीरपूरचे पोलिस अधीक्षक भगत सिंह ठाकूर यांनी सांगितले की, डीएसपी आणि स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांची टीम घटनास्थळी पाठवण्यात आली आहे आणि सखोल तपास सुरू आहे. ही घटना लक्षात घेता सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.