युद्धबंदीची घोषणा अमेरिकेने का केली? काँग्रेसचा केंद्र सरकारला सवाल
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान युद्धबंदीच्या घोषणेनंतर काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. भारताच्या भूमीवर घडणाऱ्या गंभीर राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची मौन का धारण केलं आहे आणि अमेरिकेच्या हस्तक्षेपाने युद्धबंदीची घोषणा करणे ही बाब देशासाठी चिंताजनक नाही का?, असा सवाल सरकारला केला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “देशाची जनता आणि आमची सेना यांना विश्वासात न घेताच, युद्धविरामासारख्या गंभीर घोषणांची माहिती आधी अमेरिकेच्या माध्यमातून कशी काय मिळते? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, अमेरिका या सीजफायरसाठी जबाबदार आहे. मग भारत सरकारने स्वतः घोषणा का केली नाही?”
“आज देशभरात प्रश्न विचारले जात आहेत, पण पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची यावर प्रतिक्रिया नाही. यावर मौन म्हणजे जबाबदारी झटकणे.” काँग्रेसने पंतप्रधानांवर टीका करत म्हटलं आहे की, ते सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होत नाहीत, विरोधी पक्षांच्या पत्रांना उत्तर देत नाहीत आणि फक्त एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशीच संवाद साधतात.
“पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशात जी अस्थिरता आहे, त्यावर संसदेत सविस्तर चर्चा होणे गरजेचे आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहून संसदेत विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.”
काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेड़ा यांनीही केंद्र सरकारवर जोरदार टीका करत म्हटले की, “ऑपरेशन सिंदूर ही देशासाठी गर्वाची बाब आहे, ती कोणत्याही पक्षाची जागीर नाही. पण भाजप याचा केवळ राजकीय प्रचारासाठी वापर करत आहे. हे देशहिताच्या विरोधात आहे.”
काँग्रेसने देशभरात ‘जय हिंद रॅली’ काढण्याची घोषणा केली आहे. या माध्यमातून काँग्रेस देशवासियांना केंद्र सरकारच्या पारदर्शकतेच्या अभावावर जागरूक करणार आहे. पक्षाचे म्हणणे आहे की, ऑपरेशन सिंदूरचा वापर केवळ राजकीय लाभासाठी केला जात असून, त्याविरोधात जनतेमध्ये सत्य मांडणे गरजेचे आहे.
या संपूर्ण विषयावर राहुल गांधी शुक्रवारी पत्रकार परिषद घेणार असून, युद्धबंदी, ऑपरेशन सिंदूर आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर सविस्तर भाष्य करणार आहेत. काँग्रेसने केंद्र सरकारकडून उत्तर मागत स्पष्ट विचारले आहे की, भारताच्या सार्वभौम सुरक्षेशी निगडित निर्णयांची माहिती जर आधी अमेरिका देत असेल, तर भारतीय नागरिकांना विश्वासात का घेतले जात नाही? पंतप्रधानांनी बाळगलेल्या मौनाबाबत आता देशभरात आवाज उठू लागला आहे. असं कॉंग्रेसने म्हटलं आहे.