
Rahul Gandhi
नवी दिल्ली : झारखंडमध्ये JPSC आणि JSSC परीक्षांमधील कथित अनियमितता, पेपरफुटी आणि निवड प्रक्रियेतील गैरप्रकारांविरोधात विद्यार्थी आंदोलन करत आहेत. परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासोबतच या प्रकरणांची CBI चौकशी करण्याची मागणी आंदोलक विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थी आंदोलनावर भाष्य करत सरकारला लक्ष्य केलं आहे.
पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी झारखंडमधील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणं चुकीचं असल्याचं म्हटलं. विद्यार्थ्यांना शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या मांडण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी सांगितलं.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता त्यांच्याशी संवाद साधून समस्या सोडवण्याचं आवाहन त्यांनी झारखंड सरकारला केलं. परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून त्यांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे संसदेत भाषण करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला. “२० जुलै रोजी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, खिळे लावलेल्या काठ्या आणि पेलेट गनचा वापर करण्याचे आदेश कोणी दिले, हे गृहमंत्र्यांनी स्पष्ट करावे,” अशी मागणी त्यांनी केली.
झारखंड में विरोध-प्रदर्शन कर रहे छात्रों के ख़िलाफ़ बल का इस्तेमाल ग़लत है। छात्रों को शांतिपूर्ण विरोध का अधिकार है और बातचीत से ही समाधान निकल सकता है। झारखंड सरकार को इन छात्रों की बात सुननी चाहिए और हर समस्या का तुरंत समाधान करना चाहिए। The use of force against students… — Rahul Gandhi (@RahulGandhi) August 10, 2026
या कारवाईचे आदेश अमित शाह यांनी दिले असतील तर ते त्यासाठी जबाबदार आहेत आणि जर त्यांना या कारवाईची माहिती नसेल तर ते सक्षमपणे मंत्रालय चालवत नाहीत, असा दावा राहुल गांधी यांनी केला. दोन्ही परिस्थितींमध्ये अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेला हिंसाचार आणि पोलिसांच्या कारवाईवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचं म्हटलं होतं. गृहमंत्री अमित शाह या विषयावर सभागृहात भूमिका मांडतील, असंही त्यांनी सांगितलं.
Jharkhand JPSC : परीक्षेच्या वादात मोठी खळबळ; JPSC च्या तीन सदस्यांचा राजीनामा
यानंतर इंदिरा भवन येथे पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला पुन्हा लक्ष्य केलं. झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनापासून दिल्लीतील पोलिस कारवाईपर्यंतच्या मुद्द्यांवरून काँग्रेसने सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केल्याचं चित्र आहे. दरम्यान, JPSC आणि JSSC परीक्षांमधील कथित गैरप्रकारांची चौकशी, परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार काय भूमिका घेतं, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.