
Rahul Gandhi Rahul bondre
बुलढाणा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या जिल्ह्यातच पक्षाला मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. बुलढाण्याचे काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे (Rahul Bondre) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून भाजपमध्ये जाण्याचा निर्णयही जाहीर केला होता. मात्र, ऐनवेळी बोंद्रे यांनी आपला निर्णय बदलत काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.
या संपूर्ण घडामोडीत काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या फोनची भूमिका महत्त्वाची ठरल्याचं सांगितलं जात आहे. राहुल गांधी यांनी बोंद्रे यांच्याशी फोनवर संवाद साधत त्यांची समजूत काढली. त्यानंतर बोंद्रे यांनी काँग्रेससोबतच राहण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं.
या निर्णयावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली. “राहुल गांधी कार्यकर्त्यांची काळजी घेणारा नेता आहे. राहुल बोंद्रे यांच्यावर किती प्रेशर किंवा दबाव असेल, हे त्यांच्या चेहऱ्यावरून कळतं,” असा दावा ठाकूर यांनी केला.
राहुल बोंद्रे यांच्या संस्थांवर सरकारकडून कारवाई किंवा दबाव आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. “राहुल बोंद्रे यांच्या संस्था बरबाद करण्यासाठी आत्ताचं सरकार निघालं आहे,” असं ठाकूर म्हणाल्या. हा त्यांचा राजकीय आरोप आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी बोंद्रे यांना पक्षातील त्यांच्या कामाची आठवण करून देत निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केल्याचं सांगितलं जात आहे. “तुम्ही पक्षासाठी चांगलं काम केलं आहे, तुम्ही निष्ठावान आहात. तुमची पक्षाला गरज आहे. तुम्ही निर्णयाचा फेरविचार करा,” अशा शब्दांत राहुल गांधी यांनी त्यांच्याशी संवाद साधल्याचा दावा आहे.
चिखलीचे माजी आमदार राहुलजी बोंद्रे यांनी कोणत्याही राजकीय दबावाला न घाबरता काँग्रेस पक्षासोबत आणि राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वासोबत ठामपणे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या एकनिष्ठ आणि ठाम भूमिकेला सलाम. राजकारणात परिस्थिती बदलत असताना आपल्या विचारांशी आणि पक्षाशी… pic.twitter.com/YMGgUy54qF — Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) September 22, 2026
राहुल गांधींच्या फोननंतर बोंद्रे यांना धीर मिळाल्याचं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं. त्यानंतर “माझं सर्वकाही गमावलं तरी मी काँग्रेस आणि तुमच्यासाठी काम करणार,” असा शब्द बोंद्रे यांनी राहुल गांधींना दिल्याचं त्या म्हणाल्या.
राहुल बोंद्रे हे चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. सध्या या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व भाजपच्या श्वेता महाले करतात. या घडामोडीनंतर बुलढाण्यातील काँग्रेसच्या राजकारणात पुन्हा एकदा बोंद्रे यांच्या भूमिकेची चर्चा रंगली आहे.