नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो रेट जाहीर केला असून, सलग सहाव्यांदा व्याजदरात बदल केलेला नाही. RBI ने व्याजदर 6.5% वर कायम ठेवले आहेत. रेपो रेटमध्ये कोणताही बदल न केल्याने कर्ज महाग होणार नाही आणि तुम्हाला जो हफ्ता भरायला लागतो. तो सुद्धा वाढणार नाही.
गेल्या आर्थिक वर्षात रेपो दरात 6 वेळा 2.50% ने वाढ करण्यात आली होती. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज (गुरुवार) पासून सुरू असलेल्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. दर दोन महिन्यांनी ही बैठक होते. आरबीआयने डिसेंबरच्या आधीच्या बैठकीत व्याजदर वाढवले नव्हते.
चलनविषयक धोरणाची बैठक दर दोन महिन्यांनी होते. गेल्या आर्थिक वर्ष 2022-23 ची पहिली बैठक एप्रिल-2022 मध्ये झाली होती. तेव्हा RBI ने रेपो दर 4% वर स्थिर ठेवला होता, पण 2 आणि 3 मे रोजी आपत्कालीन बैठक बोलावून RBI ने रेपो रेट 0.40% ने वाढवून 4.40% केला. रेपो दरातील हा बदल 22 मे 2020 नंतर झाला. यानंतर, 6 ते 8 जून दरम्यान झालेल्या बैठकीत रेपो दरात 0.50% वाढ करण्यात आली. यामुळे रेपो दर 4.40% वरून 4.90% झाला. त्यानंतर ऑगस्टमध्ये ते 0.50% ने वाढवून ते 5.40% वर नेले.






