RJD Tejashwi Yadav announces one government job for every household for Bihar elections 2025
Bihar Elections 2025 : बिहार : बिहारामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर करताच बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्याचबरोबर सभा आणि आश्वासनांचा अक्षरशः पूर आला आहे. बिहारमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक वचने दिले जात आहेत. यानंतर आता राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सरकारी नोकऱ्याबाबत मोठी घोषणा केली आहे.
पाटणा येथे पत्रकार परिषद घेत तेजस्वी यादव यांनी निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. तेजस्वी यादव म्हणाले की, “आजची पत्रकार परिषद विशेष आहे. निवडणूकीचा प्रचार सुरू झाला आहे. हे लोक नोकऱ्यांबद्दल नाही तर बेरोजगारी भत्त्याबद्दल बोलत आहेत. आता बिहारमध्ये बदल होईल, पुनर्जागरण होईल. आज आम्ही तुमच्यामध्ये एक क्रांतिकारी घोषणा करणार आहोत. ही आमची पहिली घोषणा आहे, शेवटची नाही. यानंतर, आम्ही आमचे दृष्टिकोन तुमच्यासमोर मांडू.”असे म्हणत तेजस्वी यादव यांनी मतदारांना आश्वासनांची खिरापत वाटण्यास सुरुवात केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पत्रकार परिषदेमध्ये पुढे ते म्हणाले की, सत्तेत आल्यानंतर वीस दिवसांच्या आत, आम्ही बिहारमधील ज्या कुटुंबात एकही सदस्य सरकारी नोकरीत नाही अशा सर्व कुटुंबांना सरकारी नोकरी देण्यासाठी कायदा आणू. आता आम्हाला विचारले जाईल की आम्ही हे कसे करू. तर आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही ते वैज्ञानिकदृष्ट्या करू आणि आमच्याकडे प्रत्येक गोष्टीचा डेटा आहे, अशा शब्दांत तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये प्रत्येक घरात सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे.
सरकार आमच्या घोषणांची नक्कल करतात
तेजस्वी यादव यांनी सरकारी नोकऱ्यांची घोषणा करताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, हे सरकार त्यांच्या सर्व घोषणांची नक्कल करत आहे. राजद नेते म्हणाले की त्यांनी १७ महिन्यांत केलेल्या कामात ५,००,००० नोकऱ्या निर्माण करणे समाविष्ट होते. आज हे लोक बेरोजगारी भत्त्याबद्दल बोलत आहेत, नोकऱ्या देण्याबद्दल नाही. यांच्यासारखे आम्ही पोकळ आश्वासने देत नाही आहोत. आम्हाला पश्चात्ताप आहे. आम्ही आमच्या १७ महिन्यांच्या राजवटीत ५,००,००० नोकऱ्या निर्माण केल्या, पण आम्ही समाधानी नव्हतो. आम्ही सामाजिक न्यायासोबत आर्थिक न्यायही मिळवू. तेजस्वी जे म्हणत आहेत ते घडेल. हे शक्य आहे. त्यांनी तेजस्वी यांनी दाखवलेल्या मार्गाची नक्कल केली आहे.” असा टोला तेजस्वी यादव यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तेजस्वी यादव पुढे म्हणाले की, २० वर्षे एनडीएने असुरक्षितता निर्माण केली आणि आता आम्ही प्रत्येक घराला रोजगार देऊ. आम्ही बिहारला एक योग्य आणि परिपूर्ण सरकार देऊ. बिहार निवडणुकीच्या निकालांचा संदर्भ देताना तेजस्वी म्हणाले, “आम्हाला पूर्ण आशा आहे की बिहारचे लोक आम्हाला आशीर्वाद देतील.” अशा शब्दांत तेजस्वी यादव यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारी नोकऱ्या देण्याची घोषणा करत सत्ता मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.