Photo Credit- Social Media अरविंद केजरीवालांसमोर विधानसभा निवडणूक जिंकण्याचे मोठे आव्हान
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी एक मोठे वक्तव्य केल्याने राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उत्पादन शुल्क गैरव्यवहार प्रकरणाचे खरे सूत्रधार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेच असून लवकरच त्यांच्याही हातात बेड्या पडतील, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
केजरीवाल यांना लक्ष्य
उत्पादन शुल्क गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसूली संचलनालयाने (ईडी) आप खासदार संजय सिंह यांना अटक केली. या पार्श्वभूमीवर भाटिया यांनी केजरीवाल यांना लक्ष्य केले आहे.
केजरीवाल यांना ३२ लाख रुपयांचा धनादेश
संजय सिंह यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री केजरीवाल यांना ३२ लाख रुपयांचा धनादेश दिल्याची कबुली उद्योगपती दिनेश अरोरा यांनी ईडीकडे दिली आहे. व्यावसायिक लाभ पोहोचविण्याच्या बदल्यात अरोरा यांच्याकडून केजरीवाल यांनीच ही लाच घेतली’’ असा सनसनाटी आरोप भाटिया यांनी केला.
न्यायालयातून जामीनही नाही
अरविंद केजरीवाल हे दिल्लीतील दारू घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचे सांगून ते म्हणाले की, त्यांचा उजवा हात मनीष सिसोदिया, ज्यांचे त्यांनी कट्टर प्रामाणिक वर्णन केले होते. ते साडेसात महिने तुरुंगात आहेत आणि सिसोदिया यांना न्यायालयातून जामीनही मिळू शकलेला नाही.
केजरीवालांची हीच विचारसरणी
केजरीवाल यांचे उजवे आणि डावे दोन्ही हात भ्रष्टाचारात गुंतले आहेत. आपल्या मंत्री आणि खासदारांना भ्रष्टाचारातून तिजोरी भरायला सांगणाऱ्या केजरीवालांची हीच विचारसरणी आहे, असे भाटिया म्हणाले.






