
ब्लॅक बॉक्स देणार अजित पवारांच्या अपघाताचे उत्तर! काय आहे ही टेक्नॉलॉजी? (Photo Credit- X)
विमान अपघाताच्या तपासात ‘ब्लॅक बॉक्स’ हा सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जातो. या यंत्राचे नाव जरी ‘ब्लॅक बॉक्स’ असले तरी याचा रंग मात्र गडद नारंगी (Bright Orange) असतो. विमान कोसळल्यानंतर पडलेल्या ढिगाऱ्यात, धुरळ्यात किंवा झाडाझुडपात हे यंत्र लांबूनच स्पष्ट दिसावे, यासाठी हा रंग दिला जातो. हे यंत्र विमानाच्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ‘शेपटी’ भागात बसवलेले असते.
ब्लॅक बॉक्समध्ये दोन स्वतंत्र उपकरणे असतात, जी विमानाची खडानखडा माहिती साठवतात:
१. CVR (Cockpit Voice Recorder – कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर)
हा भाग कॉकपिटमधील सर्व आवाज रेकॉर्ड करतो. यामध्ये मुख्य वैमानिक आणि सह-वैमानिक यांच्यातील संवाद, कंट्रोल टॉवरशी झालेले बोलणे आणि विमानातील इंजिन किंवा यंत्रणेचा आवाज कैद होतो. अपघातापूर्वी वैमानिकांनी काही धोक्याचा इशारा दिला होता का, किंवा त्यांना काही तांत्रिक अडचण जाणवली होती का, हे यावरून स्पष्ट होते.
२. FDR (Flight Data Recorder – फ्लाईट डेटा रेकॉर्डर)
हे यंत्र विमानाची तांत्रिक आकडेवारी गोळा करते. विमान किती उंचीवर होते, त्याचा वेग किती होता, इंधन किती शिल्लक होते आणि लँडिंगच्या वेळी विमानाची स्थिती काय होती, याची सेकंदा-सेकंदाची नोंद यात असते. सुमारे ८० पेक्षा जास्त तांत्रिक बाबींचा डेटा यात सुरक्षित राहतो.
ब्लॅक बॉक्स हे जगातील सर्वात मजबूत यंत्रांपैकी एक मानले जाते. हे यंत्र पोलाद आणि टायटॅनियमपासून बनवलेले असते. हे यंत्र सुमारे १,१०० अंश सेल्सिअस तापमानातही एक तास जळत राहिले तरी यातील डेटा सुरक्षित राहतो. जर विमान पाण्यात पडले, तर हे यंत्र ३० दिवसांपर्यंत सतत एक विशिष्ट ‘अल्ट्रासोनिक सिग्नल’ सोडते, ज्याच्या मदतीने खोल पाण्यातूनही याचा शोध घेता येतो.
फॉरेन्सिक तज्ज्ञ आता हा ब्लॅक बॉक्स प्रयोगशाळेत पाठवतील. तिथे विशेष सॉफ्टवेअरच्या मदतीने त्यातील डेटा ‘डिकोड’ केला जाईल. विमानाला तांत्रिक बिघाडामुळे आग लागली की हवामानामुळे अपघात झाला, याचे उत्तर लवकरच महाराष्ट्रासमोर येईल.