
Sharad Pawar on Ajit Pawar Death: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे आज बारामतीत विमान अपघातात निधन झाले. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज त्यांच्या बारामतीत चार सभाही होणार होत्या. बारामतीमध्ये सभेसाठी येत असताना अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांसह चार जणांचा दुर्दैवी अंत झाला. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त होत आहे. तसेच राजकीय वर्तुळातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईवरुन बारामतीला येत होते. अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील सहभाग घेतला होता. यानंतर सभांसाठी ते बारामतीमध्ये येणार होते. अजित पवार यांच्या अपघाती निधनावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
“राज्याचं झालेलं नुकसान भरून निघणार नाही. हा निव्वळ अपघात आहे, राजकारण नाही. यात राजकारण आणू नये, या घटनेत कोणतेही षडयंत्र नाही, ” अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी दिली आहे. माध्यमांना प्रतिक्रीया देताना शरद पवार यांना अश्रू अनावर झाले होते. राज्याचे संपूर्ण लक्ष कायम बारामतीकडे लागलेले असायचे. महाराष्ट्राच्या राजकारणात बारामती हा कायम केंद्रबिंदू राहिली. पण आज अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे.
नवराष्ट्रच्या प्रतिनिधींनी दिलेल्या वृत्तानुसार, संपूर्ण बारामतीत आज जनसागर लोटला आहे. आपल्या लाडक्या नेत्याच्या निधनाची बातमी ऐकताच राज्यभरातील अजित पवार यांचे चाहते बारामतीकडे निघाले आहेत. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात, बारामती जिल्हा रुग्णालायाच्या परिसरात त्यांच्या कार्यकर्त्यांची, चाहत्यानी गर्दी केली आहे. त्यांच्या चाहत्यांना अश्रू अनावर होत आहेत. राज्यभरातील दिग्गज मंडळी बारामतीत दाखल झाली आहेत.
दरम्यान, घटनेनंतर नवी दिल्लीत असलेले शरद पवार थेट बारामतीला पोहोचले. हेलिकॉप्टरमधून उतरताच त्यांनी रनवेवर उपस्थित अधिकाऱ्यांकडून अपघाताची सविस्तर माहिती घेतली. “विमान कुठे आणि कसे कोसळले?” असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारल्याचे सांगितले जाते.
आज दुपारी अजित पवार यांच्या निधनानंतर, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार आणि भगिनी सुप्रिया सुळे बारामती विमानतळावर पोहोचल्या. या अत्यंत कठीण प्रसंगी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांना आपले अश्रू अनावर झाले; दोघींनी एकमेकींना मिठी मारून शोक व्यक्त केला.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक सहकारी आणि विविध पक्षांचे नेते सांत्वनासाठी बारामतीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील उद्या, २९ जानेवारी रोजी बारामतीत येणार आहेत.