त्रिपुरामध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत; सुविधा पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकारकडून 25 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
त्रिपुरा : त्रिपुरा राज्याला पुराचा फटका बसला आहे. विनाशकारी पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. यामध्ये नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांचे संसार अक्षरशः पाण्याखाली गेले आहेत. यानंतर केंद्र सरकरकडून त्रिपुरासाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला. केंद्राने पूरग्रस्त त्रिपुराला राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून (NDRF) कोट्यवधी रुपये देण्यास मान्यता दिली. मात्र ही मदत पुरेशी नसल्याची टीका विरोधकांनी केली. यासाठी कॉंग्रेसने मोर्चा देखील काढला होता. त्यानंतर आता त्रिपुराच्या राज्य सरकारने देखील पूरस्थितीतून बाहेर येण्यासाठी कोट्यवधी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे.
त्रिपुरामध्ये पावसाने सर्व विक्रम मोडत जोरदार हजेरी लावली. यामुळे वस्त्यांमध्ये पाणी शिरले. ऑगस्टमध्ये विक्रमी प्रमाणात झालेल्या पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आणि खाजगी मालमत्ता, पायाभूत सुविधा आणि पिकांचे नुकसान झाले झाले. सुमारे 15,000 रुपये प्रत्येकाला देण्याची मागणी केली होती. त्रिपुरा प्रदेश काँग्रेसने सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेत पूरग्रस्तांना पुरेशी मदत देण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांनी केला. यासाठीत्यांनी रॅलीचे आयोजन केले होते. यामध्ये शेतकरी, मत्स्यपालन मालक आणि भूस्खलन आणि पुरामुळे जीवन गमावलेल्या इतर कामगार वर्गाच्या लोकांना योग्य नुकसान भरपाईची मागणी केली होती. आंदोलकांनी राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध केला. विरोधकांच्या या तीव्र विरोधानंतर त्रिपुरा राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
हे देखील वाचा : सुनील तटकरे यांचं नशीब बलवत्तर; ‘त्या’ हेलिकॉप्टरमधून करणार होते प्रवास, पण…
त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली. माणिक साहा यांनी सांगितले की, राज्याला पूराच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी 25 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. ऑगस्टमधील विनाशकारी पुराचा तडाखा बसलेल्या गुजरात, मणिपूर आणि त्रिपुरासाठी केंद्राने एक दिवसापूर्वी 675 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची (AB-PMJAY) सहा वर्षे आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या तीन वर्षांच्या राज्यस्तरीय समारंभाच्या निमित्ताने आगरतळा येथील प्रज्ञा भवन येथे पत्रकारांशी बोलताना साहा यांनी याबाबत घोषणा केली. ते म्हणाले की, “पूरस्थिती दुरुस्तीसाठी 5 कोटी केंद्राने दिले आहेत. यापूर्वी देखील केंद्र सरकारने पूरसंकटामध्ये मदतीसाठी 40 कोटी रुपये दिले होते. पायाभूत सुविधा पुनर्संचयित करण्यासाठी आणि राज्यभरातील पुरग्रस्त लोकांना मदत देण्यासाठी हा निधी वापरला जाईल,” असे आश्वासन त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी दिले आहे.