
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी दिले महत्त्वपूर्ण संकेत
नवी दिल्ली : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीला आणि त्यांनी घेतलेल्या एकतर्फी निर्णयांना आव्हान देणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या याचिकांवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने कठोर भूमिका घेतली. मंगळवारी सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या संपूर्ण प्रकरणाची आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेची तपासणी करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी झाली. मतदारयाद्यांच्या विशेष सखोर पुनरीक्षणाशी (एसआयआर) संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय अन्य दोन निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांच्या संमतीशिवाय केवळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी एकतर्फी घेतल्याचा आरोप याचिकांमध्ये करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना त्रास दिल्यास कारवाई अटळ ! कर्जवसुली एजंटांना Eknath Shinde यांचा इशारा
दरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आयोगाच्या अंतर्गत फाइल नोटिंग्ज आणि पत्रव्यवहार सुरक्षित ठेवण्याचे निर्देश देण्याची मागणी केली. निर्णय एकमताने घेतले गेले की एकतर्फी, हे ठरवण्यासाठी संबंधित नोंदी सुरक्षित ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर सरन्यायाधीशांनी, आम्हाला सर्व माहिती आहे. आम्ही प्रत्येक पैलूची तपासणी करू, असे स्पष्ट केले.
17 नोव्हेंबरला सुनावणी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांना आव्हान देणाऱ्या याचिकांवरील पुढील सुनावणी दिवाळीच्या सुट्टीनंतर होणार आहे. निवडणूक आयोगाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर याचिकाकर्त्यांना प्रत्युत्तर दाखल करण्यासाठी न्यायालयाने दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
FAQ
१. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका का दाखल करण्यात आल्या आहेत?
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर आणि निवडणूक आयोगातील काही निर्णय एकतर्फी घेतल्याच्या आरोपांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
२. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी काय म्हटले?
सुनावणीदरम्यान त्यांनी न्यायालयाला या प्रकरणाची माहिती असून सर्व बाबींची तपासणी केली जाईल, असे स्पष्ट केले.
३. वादाचा मुख्य मुद्दा काय आहे?
विशेष सखोल मतदारयादी पुनरीक्षण (SIR) संदर्भातील निर्णय घेताना निवडणूक आयोगातील सर्व सदस्यांमध्ये चर्चा झाली होती का आणि निर्णय एकमताने घेतले गेले होते का, हा मुख्य मुद्दा आहे.