West Bengal Election: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बंगालमधील राजकारण चांगलेच तापले आहे. नुकत्याच समोर आलेल्या ओपिनियन पोलच्या आकडेवारीवरून तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. टीएमसीचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी ओपिनियन पोलचे आकडे फेटाळून लावत भाजपला एक मोठे आणि अजब आव्हान दिले आहे.
पश्चिम बंगाल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूकपूर्व सर्वेक्षणाचे अहवाल समोर येत आहेत. या जनमत चाचणीच्या आकडेवारीबाबत त्यांना विचारले असता त्यांनी थेट भाजपलाच आव्हान दिले आहे. राज्यसभेतील टीएमसीचे नेते, डेरेक ओ’ब्रायन यांनी भारतीय जनता पक्षाला थेट आव्हान दिले आहे. डेरेक ओब्रायन यांनी, जर भाजपने त्यांच्या बालेकिल्ल्यात एक जरी जागा जिंकली, तर त्यांच्या पक्षाचा एक खासदार जाहीरपणे आपले टक्कल करेल, असे खुले आव्हान दिले आहे.
Weather Update : खराब हवामानामुळे यंदाच्या पावसात व्यत्यय; कमी पावसाच्या अंदाजामुळे दुष्काळाचे सावट
ओपिनियन पोलमध्ये सत्ताधारी टीएमसी आणि मुख्य विरोधी पक्ष भाजप यांच्यात चुरशीची लढत दाखवण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना ओब्रायन म्हणाले की, “कोलकात्यातील सर्व ११ विधानसभा जागांवर टीएमसीचा विजय निश्चित आहे. जर भाजपने यातील एकही जागा जिंकली, तर आमच्या पक्षाचा एक खासदार आपले डोके मुंडवून टक्कल करेल.” मात्र, ही पैज लावणारा खासदार कोण आहे, याचे नाव त्यांनी अद्याप गुलदस्त्यात ठेवले आहे.
ओब्रायन यांचा आत्मविश्वास केवळ कोलकात्यापुरता मर्यादित राहिला नाही. त्यांनी आपल्या आव्हानात हावडा आणि दक्षिण २४ परगणा जिल्ह्यांचाही समावेश केला आहे.
या दोन्ही जिल्ह्यांत भाजपने एक जरी जागा जिंकली, तरी टीएमसी खासदार आपले डोके मुंडवेल, असे ओब्रायन यांनी ठामपणे सांगितले. दरम्यान, उत्तर २४ परगणामध्ये मात्र भाजला ३-४ जागा मिळू शकतात, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. ओपिनियन पोल जाणूनबुजून टीएमसीची स्थिती कमकुवत दाखवून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या राजकीय संघर्षात टीएमसीने आता निवडणूक आयोगाच्या विरोधातही आघाडी उघडली आहे. नवीन मतदार यादीतून सुमारे ९१ लाख लोकांची नावे वगळण्यात आली असून, यात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा दावा पक्षाने केला आहे. एका विशिष्ट समुदायाचे लोकशाही हक्क हिरावून घेण्यासाठी हे पाऊल उचलले गेल्याचे टीएमसीचे म्हणणे आहे.
निवडणूक आयोगाच्या दारात धरणे आंदोलनाचा इशारा या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी डेरेक ओब्रायन आणि सागरिका घोष यांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यीय शिष्टमंडळ बुधवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची भेट घेणार आहे. जर आयोगाने भेटीसाठी वेळ दिला नाही, तर निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्याचा इशाराही तृणमूल काँग्रेसने दिला आहे.






