नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीलीभीतमधील भाजप खासदार वरुण गांधी (Varun Gandhi) यांच्याबद्दल विविध अंदाज बांधले जात असताना वरुण गांधी यांनी आगामी लोकसभेची निवडणूक अमेठी हायप्रोफाईल जागेवरून लढवण्याच्या अफवाचे खंडन केले आहे. तेथून निवडणूक लढवणार नसल्याचेही सांगितले. ही जागा नेहरू-गांधी घराण्याचा अनेक दशकांपासून बालेकिल्ला आहे.
काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या युतीच्या बाहेरून पाठिंबा घेऊन अपक्ष उमेदवार म्हणून अमेठीतून निवडणूक लढवणार असल्याच्या वृत्ताला उत्तर देताना वरुण गांधी यांनी ही माहिती दिली. दोन्ही पक्षांनी (सपा-काँग्रेस) जागावाटपाचा फॉर्म्युला मंजूर केला आणि करारात काँग्रेसला अमेठी आणि रायबरेली या दोन्ही जागा मिळाल्या आहेत. २०१९ मध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून पराभूत झालेल्या राहुल गांधी यांच्याकडे अमेठी १५ वर्षे होती. मात्र, राहुल यांनी केरळमधील वायनाडमध्ये दुसरी जागा जिंकली आणि तेथून पुन्हा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
पिलिभीतमध्ये ३० वर्षांपासून चालली ‘माँ-बेटे’ की जादू
2022 मधील यूपी विधानसभा निवडणुकीपूर्वी वरुण गांधी समाजवादी पार्टीमध्ये सहभागी होऊ शकतात अशी अटकळ होती. पण, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी लोकसभा खासदार म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी प्रतीक्षा करणे पसंत केले. मनेका आणि वरुण यांनी २००४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. वरुणने २००९ मध्ये पिलीभीतमधून पहिली निवडणूक लढवली होती. २०१३ मध्ये त्यांना पक्षाचे सरचिटणीस बनवण्यात आले.
भाजपवर वरूण गांधींची टीका
भाजप हायकमांड वरुण गांधी यांना लोकसभेचे तिकीट देणार नसल्याची चर्चा आहे. कारण पिलीभीत खासदार केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या विरोधात मुद्द्यांवर टीका करीत आहेत.