Maratha Reservation:
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार पाचच दिवसांपूर्वी नागपुरात आले होते. त्यांनी पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. झालेल्या तक्रारींवर नाराजीही व्यक्त केली. त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा शहरातील पदाधिकाऱ्यांचे नेतृत्वच बदलून टाकले. शहराध्यक्ष प्रशांत पवार यांना हटवून त्यांच्या जागी अनिल अहिरकर यांची नियुक्ती करण्यात आली. समाधानासाठी पवार यांना प्रदेश सरचिटणीस व प्रदेश प्रवक्ते पद देण्यात आले.
यासोबतच, काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेले माजी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनाही सरचिटणीसपद देऊन त्यांना सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादी अजित पवार गटात गेल्या काही दिवसांपासून नाराजीनाट्य सुरू आहे. यासंदर्भात अनेकदा वरिष्ठ पातळीवर तक्रारही करण्यात आल्या होत्या. नागपुरात पदाधिकाऱ्यांच्या तक्रारींना केराची टोपली दाखविली जाते. तसेच दौऱ्यावर असलेले पक्षाचे मंत्री कार्यकर्त्यांना भेटत नाही.
यासह इतरही बाबींकडे लक्ष वेधले गेले. त्यानंतर अजित पवार आल्यावर त्यांनी या सर्व तक्रारींची माहिती घेत थेट शहरातील नेतृत्वच बदलून टाकले. प्रशांत पवार यांच्याबद्दल अनेकांनी तक्रारी केल्याचीही माहिती पुढे आली.
पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख माजी आमदार राजेंद्र जैनही त्यांच्यापासून नाराज होते. कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनीही परवाना भवन येथे झालेल्या कार्यक्रमात प्रशांत पवारांवर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे ऐन निवडणुकीपूर्वी अनिल अहिरकर यांच्या रूपात अनुभवी नेतृत्व दिले आहे. अहिरकर हे दोन्ही राष्ट्रवादी एक असताना शहराध्यक्ष होते. त्यानंतर त्यांना प्रदेश सरचिटणीस करण्यात आले होते. पक्ष दुभंगल्यानंतर काही महिन्यानंतर ते पक्षात आले.
निवडणुकीत अनुभवाचा फायदा
अहिरकर यांना मोठा राजकीय व सामाजिक अनुभव आहे. शहरात राजकीय घडामोडीत त्यांचा सहभाग असतो. महायुतीतील भाजप व शिंदे सेनेच्या नेतृत्वाप्रमाणेच पक्षाने एक अनुभवी नेतृत्व दिले. या अनुभवाचा फायदा आगामी महापालिका निवडणुकीत होईल. मावळते शहराध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात लोकसभा व विधानसभा निवडणु निवडणुका झाल्या. आता नव्या नेतृत्वाची परीक्षा आहे.