Women Safty : महिलांच्या सुरक्षिततेसाठी आयोगाची ही नवी गाइडलाइन्स पाहिली का? 'या' सेवांवर असणार कडक निर्बंध, सौजन्य : आयएएनएस
राष्ट्रीय महिला आयोग (NCW) च्या वतीने सोमवारी ॲप-आधारित कॅबचा वापर करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी (Women Safty) मार्गदर्शक सूचना (गाइडलाइन्स) जारी करण्यात आल्या. यामध्ये प्रत्यक्ष पॅनिक बटण, वाहन ठरलेल्या मार्गापासून भरकटल्यास रिअल-टाइम अलर्ट, दीर्घकाळ किंवा संशयास्पद ठिकाणी थांबल्यास त्यावर देखरेख, तसेच कॅब सेवा पुरवठादारांनी २४×७ कमांड अँड कंट्रोल सेंटर स्थापन करण्यावर भर देण्यात आला आहे.
आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर याबाबत म्हणाल्या की, या मार्गदर्शक सूचनांचा उद्देश बुकिंगच्या वेळी, प्रवासादरम्यान आणि प्रवास पूर्ण झाल्यानंतर सुरक्षेसंदर्भातील तसेच जबाबदारी निश्चित करण्याच्या विद्यमान उपाययोजना अधिक मजबूत करणे हा आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करता येईल.
रहाटकर पुढे म्हणाल्या की, आयोगाने सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांना ही नवी मार्गदर्शक सूचना लागू करण्यासह योग्य पावलं उचलण्यास सांगितले आहे.
या मार्गदर्शक सूचनांमध्ये कॅब सेवा पुरवठादारांनी सुरक्षा प्रोटोकॉल आणि प्रमाणित कार्यपद्धतींचा (SOP) नियमित आढावा घेणे, निश्चित कालमर्यादेत तक्रारींचे निवारण करणारी यंत्रणा उपलब्ध करून देणे, तक्रारी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांकडे पाठवणे, तसेच वेळोवेळी नियमांचे पालन आणि सुरक्षाविषयक उपाययोजनांचा अहवाल सादर करण्यावरही भर देण्यात आला आहे.
मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे की, ड्रायव्हर किंवा वाहनामध्ये करण्यात आलेला कोणताही अनधिकृत बदल ॲपवर योग्य पद्धतीने नोंदवला जाईल आणि त्याकडे सुरक्षेशी संबंधित बाब म्हणून पाहिले जाईल. हे मोटार वाहन एग्रीगेटर मार्गदर्शक सूचना, २०२५ मधील कलम १५.४ नुसार आहे. या कलमानुसार प्रवास करणारा ड्रायव्हर हाच संबंधित व्यक्ती आहे, याची पडताळणी करण्यासाठी ॲपमध्ये व्यवस्था असणे आवश्यक आहे. तसेच, कलम १४.९ नुसार ड्रायव्हरचा स्पष्ट आणि उच्च-रिझोल्यूशन फोटो ॲपवर प्रदर्शित करणे आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
NCW Issues Detailed Guidelines to States and UTs for Safety of Women Passengers Using App-Based and Digital Transport Services https://t.co/DUXNKRY2b9 — NCW (@NCWIndia) October 5, 2026
तसेच ॲप-आधारित आणि डिजिटल वाहतूक सेवा वापरणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक सूचनांमध्ये निश्चित कालमर्यादेत तक्रारींचे निवारण करण्यासाठी यंत्रणा, ड्रायव्हर आणि वाहनाची पडताळणी, तसेच ॲपवर दाखवण्यात आलेली ड्रायव्हर किंवा वाहनाची माहिती प्रत्यक्षातील माहितीसोबत जुळत नसल्यास कोणताही दंड न आकारता प्रवास रद्द करण्याची सुविधा देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
उशिरा रात्रीच्या वेळी अधिक सुरक्षिततेची मागणी करताना मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे की, कॅब सेवा पुरवठादारांनी रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या चालकांच्या पडताळणी आणि देखरेखीसाठी अधिक सक्षम यंत्रणा विकसित करावी. तसेच मार्गदर्शक सूचनांमध्ये पुढे म्हटले आहे की, प्रवास सुरू होताना चालकाच्या फोटोची अनिवार्य पडताळणी, चालक मद्यधुंद अवस्थेत असल्यास त्यावर कारवाई करण्याची व्यवस्था, प्रवाशाने निवड केल्यास विश्वासू संपर्कांना प्रवासाची माहिती आपोआप शेअर करण्याची सुविधा, अधिक सक्षम कमांड अँड कंट्रोल सेंटरद्वारे देखरेख आणि प्रवासाच्या शेवटी सुरक्षित ठिकाणी सोडण्याचा पर्याय यांसारख्या उपायांचा समावेश केला जाऊ शकतो.
Rajysabha Election : भाजपने UP मधील 8 उमेदवारांची यादी केली जाहीर, दोन महिलांचा समावेश
तसेच, चालकांसाठी वेळोवेळी सुरक्षा आणि लिंग-संवेदनशीलता प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात यावा असेही आयोगाच्या वतीने सांगण्यात आले. चालकांना कामावर घेण्यापूर्वी तसेच त्यानंतरही नियमित अंतराने गुन्हेगारी नोंदींची तपासणी, पोलीस पडताळणी आणि पार्श्वभूमी तपासणी करण्याची गरजही मार्गदर्शक सूचनांमध्ये अधोरेखित करण्यात आली आहे.






