सावधान! हवामान पुन्हा बदलणार! ६ ते १० ऑक्टोबर पाऊस-हिमवृष्टीचा इशारा, ‘या’ राज्यांना IMDचा अलर्ट
नवी दिल्ली : देशातून नैऋत्य मोसमी पाऊस माघारी फिरत असतानाच हवामानात पुन्हा मोठे बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार उत्तर-पश्चिम भारतावर नव्या पश्चिमी विक्षोभाचा (Western Disturbance) प्रभाव पडणार आहे. त्यामुळे ६ ते १० ऑक्टोबरदरम्यान पश्चिम हिमालयीन भागात पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे.
जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ६ ते १० ऑक्टोबरदरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. उंचावरील भागांत हिमवृष्टीही होऊ शकते. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम भारतातील मैदानी प्रदेशावरही या हवामान प्रणालीचा परिणाम जाणवू शकतो. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांत ६ ते ११ ऑक्टोबरदरम्यान तुरळक पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Badrinath : बद्रीनाथ धामचा नवा विक्रम, 18.67 लाख पेक्षा जास्त भाविकांनी घेतले दर्शन
५ ऑक्टोबरला दिल्लीत आकाश प्रामुख्याने निरभ्र राहण्याचा अंदाज असून कमाल तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सिअस राहू शकते. त्यानंतर पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे हलका पाऊस किंवा रिमझिम सरींसह वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
पुढील काही दिवस दिल्लीच्या आकाशात अंशतः ढगाळ वातावरण राहू शकते. कमाल तापमान ३३ ते ३५ अंश, तर किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. पावसामुळे तापमानात काही प्रमाणात घट होऊ शकते.
उत्तर भारतासोबत दक्षिण भारतातही पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. किनारपट्टी कर्नाटक आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकच्या काही भागांत १२ ते २० सेंटीमीटरपर्यंत अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तमिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि केरळमध्येही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ईशान्य भारतातील उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्येही पावसाची स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.
सध्या देशाच्या विविध भागांवर पश्चिमी विक्षोभ, ट्रफ रेषा आणि चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीसह अनेक हवामान प्रणाली सक्रिय आहेत. गंगेच्या पश्चिम बंगालपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत एक ट्रफ असून उत्तर-पश्चिम उत्तर प्रदेश ते पूर्व बांगलादेशपर्यंत आणखी एक ट्रफ सक्रिय आहे. उत्तर अंतर्गत कर्नाटक परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, नैऋत्य मोसमी पावसाची परतीची रेषा सुपौल, रांची, रायपूर, ब्रह्मपुरी, परभणी, बारामती आणि हरनाई परिसरातून जात असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे एकीकडे मान्सूनची माघार सुरू असताना दुसरीकडे विविध हवामान प्रणालींमुळे देशाच्या अनेक भागांत पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
Rajysabha Election : भाजपने UP मधील 8 उमेदवारांची यादी केली जाहीर, दोन महिलांचा समावेश






