
197 candidates have withdrawn from the Parbhani Municipal Corporation elections
Maharashtra Local Body Elections : परभणी : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आणि मागे घेण्याची तारीख आता संपली आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. मात्र राज्यामध्ये अनेक उमेदवार हे बिनविरोध निवडून येत असल्यामुळे विरोधकांनी संशय व्यक्त केला आहे. त्याचबरोबर अनेकांनी उमेदवारी मागे घेतली आहे यामुळे चुरशीच्या लढतीमध्ये शीतलता आली आहे. परभणी महापालिका निवडणुकीमध्ये तब्बल 197 जणांनी माघार घेतली असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मनपाच्या निवडणूक प्रक्रियेत अर्ज छाननीमध्ये २१ उमेदवार बाद झाल्यानंतर १ व २ जानेवारी या दोन दिवसांत १९७ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता १६ प्रभागांत मिळून एकूण ४११ उमेदवार रिंगणात उरले आहेत. शुक्रवार (दि.२) हा अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता, त्यामुळे बंडखोरांना थंड करण्यासाठी विविध पक्षांची नेतेमंडळी दिवसभर व्यस्त होती. १६ प्रभागांतील ६५ जागांसाठी सुरू असलेल्या निवडणुक प्रक्रियेत नामनिर्देशनपत्र सादरीकरणाच्या शेवटच्या दिवशीपर्यंत एकूण ९२६ अर्ज आले होते. त्यानंतर छाननी प्रक्रियादरम्यान १८ जण रिंगणाबाहेर गेले. त्यामुळे प्रत्यक्ष उमेदवारांची संख्या ही ६०८ एवढी राहिली होती.
हे देखील वाचा : ‘देवा भाऊ देता है तो…’; महायुतीच्या ‘या’ शिलेदाराने फडणवीसांबद्दल केले मोठे भाष्य
त्यानंतर प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह काही अपक्षांकडून आपल्या प्रभागांतील प्रतिस्पर्धी उमेदवाराने अर्ज माघारी घ्यावा, यासाठी मनधरणी केली जात होती. यानंतर अनेक पक्षीय नेत्यांना यामध्ये यश आल्याचे दिसून आले आहे. 30 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत मनधरणी केल्यानंतर अनेकांनी उमेदवारी मागे घेतली आहे. यामुळे स्पर्धा कमी करण्यात राजकीय नेते मंडळींना यश मिळाले आहे. तसेच यामुळे मते राखण्यामध्ये देखील मदत झाली आहे.
हे देखील वाचा : महायुतीमध्ये आली नामुष्की? अजित पवारांची पोलखोल अन् रवींद्र चव्हाणांचा पलटवार
उमेदवारांचे मतविभाजन टाळण्यासाठी प्रयत्न
मतांचे विभाजन टाळण्यासाठी प्रत्येक उमेदवाराकडून विविध प्रकारचे प्रयत्न करण्यात आले.
त्यात काहींना यश मिळाल्याने गुरुवारी ३५ आणि शुक्रवारी १६२ असे दोन दिवसांत एकूण १९७ जणांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. आता १६ प्रभागात मिळून एकूण ४११ उमेदवार रिंगणात असून अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
सर्वात कमी १२ उमेदवार प्रभाग क्रमांक १ तर सर्वाधिक ३६ उमेदवार प्रभाग क्रमांक १२ मध्ये राहिले आहेत.
तसेच पाच नगरसेवकांचा एकमेव असलेल्या प्रभाग क्रमांक १५ मधून २५ उमेदवार रिंगणात आहेत.
महापालिकेच्या ६५ जागांच्या होणाऱ्या निवडणुकीत सर्वच प्रभागांमध्ये तिरंगी, चौरंगी किंवा त्यापेक्षाही अधिक उमेदवारांमध्ये रंगतदार लढत होणार आहे.