पाटणा : महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येही (Bihar) राजकीय उलथापालथ झाली आहे. खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या ‘एमआयएम’ला (MIM) धक्का बसला आहे. बिहारमधील ‘एमआयएम’चे पाचपैकी चार आमदार राष्ट्रीय जनता दलात (RJD) दाखल झाले आहेत.
कोचीधामन मतदारसंघाचे आमदार मोहंमद इजहार अस्फी, जोकीहाट मतदारसंघाचे आमदार शाहनवाझ आलम, पूर्णियाच्या बायसी मतदारसंघाचे आमदार सय्यद रुकनुद्दीन अहमद आणि बहादूरगंज विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनजार नईमी यांनी राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला. विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांनी एका रात्रीतून चार आमदारांना आपल्या बाजूला ओढले आणि त्याची साधी काणकुणही ओवेसी यांना लागली नाही.
पावसाळी अधिवेशनात आपल्या आमदारांना अग्निपथच्या मुद्द्यावरून आवाज उठविण्याचे सांगितले, तर दुसरीकडे तेजस्वी यादव एमआयएमचे आमदार राजदमध्ये आणण्याचे प्रयत्न करत होते. सदर चार आमदार इजहार अस्फी, शाहनवाझ आलम, सैयद रुकुनुद्दीन अहमद आणि अनजार नईमी हे विधानसभा अध्यक्षाच्या चेंबरकडे जात असल्याचे पाहून मोठ्या राजकीय हालचालीचा संशय आला. त्यानंतर तेजस्वी यादव यांनी चित्र स्पष्ट केले.