अहमदनगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बायोडिझेल विक्री (Biodiesel Sales Racket) प्रकरणात पोलिसांनी आठ जणांना अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीत आणखी १२ जणांची नावे समोर आली आहेत. त्यामुळे आरोपींची संख्या वाढून आता वीसपर्यंत जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान नगर शहराच्या केडगाव उपनगरातील एका राजकीय नेत्याकडे पोलिसांची संशयाची सूई वळली असून, अटकेतील आरोपींच्या माहिती आधारेच हा नेताही आता पोलिसांच्या रडारवर आला आहे.
२२ ऑक्टोबरला पोलीस व पुरवठा विभागाने केडगाव बायपास चौकात छापा टाकून मालवाहतूक ट्रॅकमध्ये बायोडिझेल भरले जात असल्याचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात सुरूवातीला दोन आणि नंतर सहा अशा आठ जणांना पोलिसांनी अटक केली. अटकेतील सहा जणांच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपणार आहे. त्यापूर्वीच पोलिसी स्टाईलने आरोपींकडून रॅकेटचे इत्यंभूत माहिती तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी मिळविण्यात यश मिळविले. शुक्रवारी आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतर १२ नव्या आरोपींच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
ज्या नेत्याकडे संशयाची सुई वळली आहे, तो एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वी नगरमध्ये बायोडिझेलचे रॅकेट पकडले तेव्हाही हा नेता पोलिसांच्या रडारवर आला होता, मात्र त्यावेळी तो सटकला होता, आता तो सटकणार नाही याची तजवीज पोलिसांनी केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
आमदार जगतापांचे गृहमंत्र्यांना पत्र
नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी बायोडिझेल प्रकरणाचा सखोल तपास करून खरा सूत्रधार समोर आणून त्याला अटक करावी, यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेत त्यांना पत्र दिले. या पत्रानंतर पोलीस यंत्रणेचा तपास वेगाने सुरू असून, लवकरच केडगावच्या नेत्याला बेड्या ठोकल्या जातील, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र, तपास सुरू असून आरोपी अटक करणे बाकी आहे. त्यामुळे या नेत्याचे नाव सांगण्यास पोलिसांनी नकार दिला.