पुणे : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार सुरु आहे. पुण्यामध्ये तिहेरी लढत होणार आहे. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली आहे. भाजप नेत्यांनी पुण्यामध्ये जोरदार प्रचार देखील सुरु केला आहे. मात्र धार्मिक प्रलोभने दाखवल्याचा आरोपाखाली उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. कॉंग्रेस पक्षाकडून मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधामध्ये सदर तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
.
भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी वर्तमानपत्रांच्या माध्यमातून पत्रके वाटली होती. या पत्रकांच्या माध्यमातून धार्मिक प्रलोभन दाखवण्याचा आरोप करण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये “राम मंदिर झाले आता राष्ट्रमंदिरासाठी संकल्प करूयात” असा मथळा लिहिण्यात आलेला होता. पोस्टरमध्ये प्रभू रामांचे उद्घाटनाच्या दिवशीचा फोटो छापण्यात आलेला होता. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी राममूर्तीच्या पाया पडत आहेत असे छायाचित्र होते. रामनवमीच्या दिवशी मुरलीधर मोहोळ यांनी या आशयाचे पोस्टर घराघरांमध्ये पोहचवले.
याच्या विरोधामध्ये कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रचारामधून धार्मिक प्रलोभन दाखवले असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. याप्रकरणी माजी आमदार मोहन जोशी व काँग्रेसचे सोशल मीडिया राज्य समन्वयक चैतन्य पुरंदरे यांनी सांगितले की, “राम मंदिराला निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनवत भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी याद्वारे धार्मिक प्रलोभन दाखवत यांनी मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे.” आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पुरंदरे यांनी मोहोळ यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पुरंदरे यांची भेट घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.
महाविकास आघाडीकडून कॉंग्रेस पक्षातील रवींद्र धंगेकर हे अधिकृत उमेदवार आहेत. कसबा पोटनिवडणूकीमध्ये भाजपचा धुव्वाधार पराभव केलेल्या धंगेकरांना पुन्हा एकदा लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर रवींद्र धंगेकर यांचे कडवे आव्हान असणार आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.