शिवसेनेने रवींद्र धंगेकरांवर सोपवली मोठी जबाबदारी; महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्णय
काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसला रामराम ठोकत रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशाची त्यावेळी राज्यात मोठी चर्चा झाली होती. दरम्यान धंगेकर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाणार असल्याच्या चर्चा होत्या. अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या असून धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या विश्वासातील नेते म्हणून ओळख निर्माण केली असून त्यांची पुणे महानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
महानगर प्रमुख पदाच्या अंतर्गत दोन ते तीन शहरं असतात. संपूर्ण पुणे शहरातील संघटनात्मक बांधणी, प्रचार, निवडणूक तयारी करून घेणे आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्व घडवण्याची जबाबदारी या पदावरील व्यक्तीकडे असते. कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत धंगेकर काँग्रेसकडून भाजपचा बालेकिल्ला फोडणारे एकमेव नेते ठरले होते. त्यांच्या या विजयामुळेच त्यांना शिंदे गटाकडून महत्त्वाची जबाबदारी मिळणार अशी चर्चा होती.
छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेताच अंजली दमानिया आक्रमक; लवकरच घेणार ‘हा’ मोठा निर्णय
धंगेकर यांच्या नियुक्तीमुळे शिंदे गट पुण्यात आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं पहायला मिळत आहे. धंगेकर यांच्या अनुभवाचा फायदा आगामी महापालिका आणि इतर स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाला होणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शहर संघटना नव्याने सज्ज होणार असून, पक्षाला पुन्हा एकदा पुण्यात मजबूत स्थान मिळवून देण्यासाठी ही योजना आखली गेली आहे. राजकीयदृष्ट्या ही नियुक्ती धंगेकर यांच्या कारकिर्दीतला महत्त्वाचा टप्पा असून, येत्या काळात त्यांच्या कार्यपद्धतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं असणार आहे.