पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजूरी (फोटो- istockphoto)
पुणे: पुणे मेट्रोच्या दोन महत्वाच्या विस्तारीत मार्गांना केंद्र सरकारकडून अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज बुधवारी झालेल्या बैठकीत वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते विठ्ठलवाडी (वाघोली) या मेट्रो मार्गांना हिरवा कंदील दाखवला आहे. एकूण सुमारे ३,७५६.५८ कोटी रूपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे पुणे मेट्रोचा शहराच्या दोन दिशांना विस्तार होणार असून, नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतुकीचा एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे.
या दोन्ही प्रकल्पांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा प्रत्येकी 20 वाटा असून उर्वरित 60% निधी हा महा-मेट्रोमार्फत कर्जाच्या स्वरूपात उभारण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना गती मिळणार असून लवकरच टेंडर प्रक्रिया आणि प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होणार आहे. पुणेकरांसाठी हा निर्णय म्हणजे वाहतूक कोंडीवरचा उपाय आणि वेगवान प्रवासासाठी एक मोठं पाऊल ठरणार आहे. महत्त्वाचे म्हणजे पुर्वेकडील आयटी हब मेट्रोने जोडले जाणार आहे.
वनाज ते चांदणी चौक (मार्गिका २अ) या विस्तारित मार्गावर २ स्थानके (कोथरूड बस डेपो, चांदणी चौक) असून, त्याची लांबी १.२ किमी असणार आहे. यामुळे वनाज ते चांदणी चौक परिसरातील नागरिकांना मेट्रोची सुविधा उपलब्ध होईल. रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (मार्गिका २ब) या मार्गावर ११ स्थानके (विमान नगर, सोमनाथ नगर, खराडी बायपास, तुळजाभवानी, उबाळे नगर, अप्पर खराडी रोड, वाघेश्वर मंदिर, वाघोली, सिद्धार्थ नगर, बकोरी फाटा, विठ्ठलवाडी) असतील आणि त्याची लांबी ११.६३ किमी असेल. या विस्ताराने वाघोली आणि विठ्ठलवाडी हा भाग मेट्रोने उर्वरित शहराला जोडला जाणार आहे.
या दोन्ही उन्नत मार्गिकांची एकूण लांबी १२.७५ किमी असून, यामध्ये १३ नवीन स्थानके जोडली जातील. या संपूर्ण प्रकल्पाचा एकूण खर्च ३६२४.२४ कोटी रुपये अपेक्षित असून, तो पूर्ण होण्यासाठी अंदाजे ४ वर्षांचा कालावधी लागेल. या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी म्हटले आहे की, या दोन्ही मार्गिकांमुळे पुणे शहराचे मोठ्या प्रमाणावर विस्तारित पूर्व व पश्चिम भाग मेट्रोने उर्वरित शहराशी जोडला जाणार आहे. या भागातील हजारो नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
पुणे करांचा मेट्रो प्रवास हा आता आणखी सुखकर होणार आहे. कारण पुण्यातील वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मान्यता मिळालेली आहे. वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या जवळपास पावणे 13 किलोमीटरच्या मेट्रो मार्गाला अखेर मान्यता मिळालेली आहे. या आधी आपण पाहिले पुण्यात 32 किलोमीटरचे मेट्रो मार्ग सेवेमध्ये आहेत. केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी या विस्तारीकरणासाठी पाठपुरावा केलेला होता. त्याचबरोबर पुणे शहरातील आणखीन दोन नवीन मेट्रो मार्गांसाठी देखील DPR करण्याची सूचना यामध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे येत्या काळात पुण्यात मेट्रोचे जाळे आणखीन विस्तारणार आहे. या नव्या मेट्रोच्या विस्तारीकरणासाठी तीन हजार 600 कोटींपेक्षा जास्त खर्च येणार आहे.
– मुरलीधर मोहोळ, (केंद्रीय राज्यमंत्री)