''कोणी एक पैसा देखील तुमच्या खात्यातून...''; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे लाडक्या बहिणींना आश्वासन
कोल्हापूर: जनतेच्या हितासाठी शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या योजनांना विरोधकांच्याकडून खोडा घालण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे . लाडकी बहीण योजना सुद्धा हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र आमच्या शासनाने दिलेले वचन पूर्ण केले आहे .अशा या विरोधी सावत्र भावांना कोल्हापुरी जोडा दाखवा असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कोल्हापूर येथील तपोवन मैदानात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचन स्फूर्ती सोहळ्याचे आयोजन आज या ठिकाणी करण्यात आले होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आगमन होताच उपस्थित महिला वर्गाने त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून जोरदार घोषणाबाजी केली .यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व महिलांना अभिवादन करत महिलांच्या कडून आलेल्या राख्या बांधून घेतल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गोरगरिबांना त्यांचे सण साजरे व्हावे यासाठी आनंदाची शिधा ही योजना सुरू केली. त्यावेळी सुद्धा विरोधकांनी खोडा घातला शेवटी न्यायालयात जाऊन याबाबत दाद मागितली. मुलींचे मोफत शिक्षण या योजनेची अंमलबजावणी केली. शेतकऱ्यांचे वीज माफ बिल माफ केले. त्यांच्यासाठी विविध योजना आणल्या. आता सर्वसामान्य जनतेच्या उन्नतीसाठी लाडकी बहीण अशा अनेक योजना सुरू केली आहे. या योजनांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला यामुळे अनेकांच्या पोटात दुखू लागले. त्यामुळे त्यांनी या सर्व योजना केवळ निवडणुकी पुरत्याच असल्याचे सांगत बदनामी सुरू केली आहे. पण तुमचा भाऊ म्हणून या ठिकाणी सांगतो सरकारने या सुरू केलेल्या कोणत्याही योजना बंद करणार नाही. उलट त्याची रक्कम वाढवली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात केली.
आज कोल्हापूर येथील संभाजीनगरमध्ये तपोवन मैदानात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमवेत सहभागी झालो. यावेळी उपस्थितांना संबोधित केलं.
आज कोल्हापूरच्या ऐतिहासिक पवित्र… pic.twitter.com/leUxisIkzW
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 22, 2024
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ”आम्ही सर्वसामान्यांच्या हितासाठी सुरू केलेल्या योजना बंद करण्यासाठी विरोधकांच्याकडून प्रयत्न केले. न्यायालयात गेले कारण या योजनांमुळे त्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. पायाखालची जमीन घसरली आहे .आमच्या सरकारला बदनाम करण्यासाठी लोकांची दिशाभूल करून फेक नॅरेटिव्ह पसरवला जात आहे. त्यामुळे आता जनता फसणार नाही याची त्यांना जाणीव आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे या सावत्र भावांनी बदनामीचा डाव रचला आहे .सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या आणि पैशाच्या गादीवर लोळणारे दीड हजाराचे मूल्य कळणार नाही असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. अशा लोकांना बाजूला काढा तुमच्या जीवनाच्या आम्ही सोनं करू ”, असेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ”दिलेले पैसे काढून घेतील अशा थापा मारत विरोधक भीती घालत आहेत. पण एक पैसा सुद्धा तुमच्या खात्यावरून कोणीही काढून घेणार नाही काम करत राहणार विकास करणार असे सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ,तुमचे सावत्र भाऊ काहीही सांगत असले तरी या योजना बंद होणार नाहीत कारण हे संवेदनशील सरकार आहे कुणीही कितीही टीका केली तरी हे सरकार तुमचचे आहे तुमच्या हितासाठीच ते सत्तेवर आहे. आम्ही पळून जाणारे नाही लढणारे आहे ”, असे म्हणाले.
महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कार्यक्रम, कोल्हापूर : https://t.co/NyYzFGC1Sf
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 22, 2024
या मेळाव्यास खासदार धैर्यशील माने, आमदार उदय सामंत, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर ,खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार निवेदिता माने, मंत्री चंद्रकांत दादा पाटील ,माजी आमदार अमल महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार भरमू सुबराव पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, माजी खासदार संजय मंडलिक, यांच्यासह भाजप ,शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.