चित्रपट, नाटकं, जाहिरात, मालिकांमधून अभिनयाचा ठस उमवणाऱ्या आणि प्रेक्षकांवर आजीच्या भूमिकेतून प्रेम करणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री रेखा काम यांच निधन झालं आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी वृद्धापकाळानं यांचं निधन झालं. मुंबईतील माहिम इथल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला(Exit of Cineworls grandmother veteran actress Rekha Kamat passed away in mumbai).
केवळ चित्रपटच नव्हे तर व्यावसायिक मराठी रंगभूमीवरही रेखा कामत यांनी अभिनयाचा ठसा उमटवला होता. 1952 मध्ये प्रदर्शित ‘लाखाची गोष्ट’ हा रेखा कामत यांचा पहिला चित्रपट. याच त्यांची बहिण चित्रा यांनीसुद्धा काम केलं होतं. रेखा कामत आणि चित्रा नवाथे या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. या दोघी बहिणींनी मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजविला. मालिकांमध्ये ही त्यांनी काम केले. प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित ‘प्रपंच’ ही त्यांची पहिली मालिका. या मालिकेत त्यांनी साकारलेली ‘आक्का’ ही भूमिका त्याकाळी गाजली होती. ‘सांजसावल्या’ मालिकेतही त्यांनी काम केले. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मधील ‘माई आजी’ तर प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. ‘आजी’ असावी तर अशी, अशी ओळख या मालिकेमुळे त्यांना मिळाली. नव्या पिढीलाही रेखा कामत हे नाव माहिती झाले. अनेक जाहिरातींमधूनही त्यांनी ‘आजी’ची भूमिका साकारली आहे. चित्रपट, नाटक, मालिका, जाहिराती अभिनयाच्या या चारही क्षेत्रांत त्यांनी भरपूर काम केले असले तरी नाटक हे त्यांच्या अधिक आवडीचे होते.
मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ पाहिल्यानंतर उतारवयातही त्यांनी अभिनय करणं सुरू ठेवलं. एका लग्नाची दुसरी गोष्ट, प्रपंच, माणूस, तरुण तुर्क म्हातारे अर्क, प्रेमाच्या गावा जावे, लग्नाची बेडी, ऋणानुबंध, अग्गबाई अरेच्चा! या चित्रपट, नाटक आणि मालिकेतून त्यांनी अभिनय साकारला होता. काही वर्षांपूर्वी त्यानी प्रकृती अस्वास्थ्यामुळे अभिनयातून निवृत्ती स्वीकारली होती. ‘आजी’ हा त्यांनी केलेला शेवटचा चित्रपट आहे.