अफगाणिस्तानने चारली हाँगकाँगला धूळ (फोटो सौजन्य - Instagram)
१८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हाँगकाँगला अफगाणिस्तानसमोर कोणतेही आव्हान उभे करता आले नाही. हाँगकाँगच्या एकाही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि डाव ९४ धावांमध्येच गुंडाळला गेला आणि ९४ धावांनी हा सामना जिंकला आहे. अफगाणिस्तानने संपूर्ण झंझावाती खेळी करत हाँगकाँगचा संपूर्ण संघ केवळ ९४ धावांमध्ये गारद केला आहे.
अफगाणिस्तान आणि हाँगकाँगच्या संघात आज पहिला सामना खेळवला गेला आणि अफगाणिस्तानने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये आपण निपुण असल्याचे दाखवून दिले आहे. हाँगकाँगच्या संघाला कुठेही श्वास घ्यायला जागा न देता धडाधडा त्यांचे खेळाडू अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी तंबूत परत पाठवले आणि ९४ धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकून पॉईंट्स आपल्या खात्यात जमा केले आहेत.
हाँगकाँगचा उडवला धुव्वा
पॉवरप्लेमध्ये त्यांनी चार विकेट गमावल्या आणि फक्त २३ धावा केल्या. आशिया कप २०२५ च्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने दिलेल्या १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या हाँगकाँगने दुसऱ्याच चेंडूवर विकेट गमावली. अंशुमन राठ खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. तर दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ५ धावा काढून झिशान अली पॅव्हेलियनमध्ये परतला.
अफगाणिस्ताने रचला धावांचा डोंगर
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानने सेदिकुल्लाह अटलच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या मदतीने २० षटकांत १८८ धावा केल्या आणि हाँगकाँगला विजयासाठी १८९ धावांचे लक्ष्य दिले. अफगाणिस्तानने शेवटच्या पाच षटकांत ७८ धावा केल्या. सेदिकुल्लाह अटलने ५२ चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांसह ७३ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्याशिवाय अजमतुल्लाह उमरझाईने २१ चेंडूंत २ चौकार आणि पाच षटकारांसह ५३ धावा केल्या. मोहम्मद नबीने ३३ धावांचे योगदान दिले. या सामन्यात हाँगकाँगचे क्षेत्ररक्षण खूपच खराब होते आणि संघाने अनेक झेल सोडले, ज्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले.
हाँगकाँगच्या खेळाडूंचे हाल
बाबर हयात वगळता हाँगकाँगचा कोणताही फलंदाज विशेष कामगिरी दाखवू शकला नाही. बाबर हयातने ४३ चेंडूत ३९ धावा करून थोडी संघर्षपूर्ण कामगिरी केली. त्याच्याशिवाय यासीन मुर्तझा १६ धावा करू शकला. या दोघांशिवाय इतर कोणताही फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकला नाही. पहिल्या षटकापासून सुरू झालेला विकेट्स पडण्याचा क्रम शेवटच्या षटकापर्यंत चालू राहिला. अफगाणिस्तानकडून फजलहक फारुकी यांनी ३ षटकात १६ धावा देत २ विकेट्स घेतल्या. गुलबदीन नायब यांनी ३ षटकात १८ धावा देत २ विकेट्स घेतल्या. तर नूर, रशीद आणि अझमतुल्लाह यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतल्या.
अफगाणिस्तान प्लेइंग इलेव्हन: रहमानउल्ला गुरबाज (डब्ल्यू), सेदीकुल्लाह अटल, इब्राहिम झद्रान, गुलबदिन नायब, अजमातुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, करीम जनात, रशीद खान (क), नूर अहमद, एएम गझनफर, फजलहक फारुकी
हाँगकाँग प्लेइंग इलेव्हन: झीशान अली (w), बाबर हयात, अंशुमन रथ, कल्हान छल्लू, निजाकत खान, एजाज खान, किंचित शाह, यासीम मुर्तझा (क), आयुष शुक्ला, अतीक इक्बाल, एहसान खान
Asia Cup 2025: 6, 6, 6, 4…54 धावांचा पाऊस, 4 मेडन ओव्हर देणाऱ्या बॉलर्सची आशिया कपमध्ये वळली बोबडी