संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात अपघाताच्या घटना वाढल्या आहे. दररोज वेगवेगळ्या भागात अपघातात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हडपसरमधील जेएसपीएम कॉलेज परिसरात भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत एका १९ वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अपघातानंतर डंपरचालक घटनास्थळी न थांबता तसेच त्याची माहिती न देता पसार झाला आहे. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
अभिजीत गणेश रेवले (वय १९, रा. फुरसुंगी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात अज्ञात डंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत त्याचे भाऊजी कचन कराळे (वय ४२) यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अभिजीत हा फुरसुंगी परिसरातील संकेत विहार गल्लीत राहण्यास आहे. दरम्यान, तो सोमवारी रात्री सातच्या सुमारास त्याच्या दुचाकीवरून जेएसपीएम कॉलेज जवळून निघाला होता. तो अहिल्यादेवी होळकर चौकात आला असता पाठिमागून आलेल्या भरधाव डंपरने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत तो खाली पडून गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, डंपरचालक पसार झाला असून, त्याचा शोध पोलिस घेत आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक गुरव हे करत आहेत.
नांदेडमध्ये भीषण अपघात
नांदेडमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नांदेडच्या भोकर तालुक्यातील पाळज येथील प्रसिद्ध असलेल्या गणपतीचे दर्शन घेऊन परत जात होती तेव्हा हा अपघात घडला. भोकर तालुक्यातील नांदा म्है.प. येथील शाळेजवळ उभ्या असलेल्या ट्रकला कारने धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला आहे. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. मयत सर्व तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्यातील बोधन येथील रहिवासी आहे. ही घटना बुधवारी घडली आहे.