गणपतीला गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आता खुशखबर आहे. कोकणात गणपतीला गावी जायचं म्हटलं तर तिकिट मिळता मिळत नाही. तिकिटांसाठी चाकरमान्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. अशातच आता कोकण रेल्वे संदर्भात महत्वाची अपडेट समोर येत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती सणात चाकरमान्यांसाठी आमदार निलेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून विशेष ट्रेन २५ ऑगस्ट २०२५ रोजी धावणार आहे. ही विशेष शिवसेना एक्सप्रेस दादर ते कुडाळ या स्थानकांदरम्यान धावणार आहे. मुंबईतील चाकरमान्यांना ही गणपती विशेष ट्रेन मोफत सेवा देण्यात येईल, अशी माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांच्या वतीने गणेशोत्सवासाठी कुडाळ आणि मालवण तालुक्यातील गणेशभक्तांसाठी “शिवसेना एक्स्प्रेस” या विशेष ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे. 25 ऑगस्ट रोजी सकाळी सुटणाऱ्या या शिवसेना एक्स्प्रेसमधून गणेश भक्तांना मोफत प्रवासाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही रेल्वे दादर ते कुडाळपर्यंत धावणार आहे.
मुंबईमधून आपल्या गावी गणेशोत्सवासाठी जाण्यासाठी दादर ते कुडाळ स्थानकापर्यंत ही विशेष ट्रेन आयोजित करण्यात आली आहे. 25 ऑगस्टला ही ट्रेन दादर रेल्वे स्टेशन येथून सकाळी 10 वाजता सुटणार आहे. या ट्रेन मध्ये विनामूल्य तिकीट बुकिंगसाठी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत – 8652489964, 8652272031 यांच्याशी संपर्क साधावा.
बुकिंगसाठी आपले आधारकार्ड/ मतदार ओळखपत्र यापैकी एक आवश्यक आहे. तरी भाविकांनी लवकरात लवकर आपली सीट बुक करावी आणि आपल्या गावी उत्साहाने गणेशोत्सव साजरा करावा, सदर ट्रेन अन्य कुठल्याही स्थानकावर थांबणार नाही. सदर रेल्वे प्रवास हा सर्व प्रवाश्यांसाठी विनामूल्य आहे. ह्याचे कुठल्याही प्रकारे प्रवासभाडे आकारण्यात येणार नाही, नागरिकांनी ह्याची नोंद घेऊन या रेल्वे प्रवासाचे कोणतेही भाडे देऊ नये, असे आवाहन आमदार निलेश राणे यांनी केले आहे.