शिर्डी : उत्तर प्रदेशसह अन्य तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेला विजय हा देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या विकासात्मक वाटचालीवर जनतेने केलेले शिक्कामोर्तब असल्याचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
माध्यमांशी बोलताना विखे पाटील म्हणाले की, केंद्र सरकारने मागील सात वर्षात मोदीजींच्या नेतृत्वाखाली सामान्यांसाठी सुरु असलेली विकास प्रक्रीया यालाच चारही राज्यातील जनतेने पाठबळ दिले आहे. उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिराचा प्रश्न, काशी विश्वेश्वर मंदिर परिसराचा विकास मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी साकार करुन दाखविला. उत्तरप्रदेशमध्ये जातीपाजीच्या राजकारणापेक्षा विकासाला लोकांनी प्राधान्य दिले. विरोधकांना ही मोठी चपराक आहे.
उत्तर प्रदेशमधील जनता पुन्हा विकासाच्याच मागे उभी राहीली असल्याचे विखे पाटील म्हणाले.
गोवा, मणीपूर आणि उत्तराखंड या राज्यातील निकाल पाहाता जनतेला आता विकास हवा आहे. मागील सात वर्षात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशातील सामान्य माणसांसाठी सुरु केलेल्या योजना आणि त्याची होत असलेली यशस्वी अंमलबजावणी यामुळेच भारतीय जनता पक्षावर जनतेने विश्वास पुन्हा दाखविला. सबका साथ सबका विकास हा मंत्र घेवून मोदीजींच्या नेतृत्वाखाली बदलत्या भारताला या निवडणूकीत मिळालेले समर्थन हे महत्वपूर्ण असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
राज्यातील महाविकास आघाडीचे नेते निवडणूकीत आमच्यावर टिका करुन, दिल्लीतील स्वप्न पाहत होते पण त्यांना नोटा पेक्षाही कमी मतं मिळाले. त्यांनी आता आत्मपरिक्षण करण्याची गरज असून, शिवसेनेने विश्वासघात करुन, सत्ता मिळविली. महाराष्ट्रातही आघाडीची हीच आवस्था होईल असे सांगतानाच कॉंग्रेसने आता राजकारण सोडून लोककल्याणाचा कार्यक्रम हाती घ्यावा आणि आत्मचिंतन करावे असा टोलाही आ.विखे पाटील यांनी लगावला.
चार राज्यात मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमिवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आ.विखे पाटील यांनी शिर्डीच्या श्री साईबाबांची प्रतिमा देवून सत्कार केला.