कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत येणाऱ्या भाविकांची फसवणूक, लूट होऊ नये याची दक्षता या पथकाने घ्यावयाची आहे. विशेषतः हार प्रसाद दुकान, एजंट यांच्यावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. शिर्डीत दहा दिवसांच्या कालावधीत दोन पोस्कोअंतर्गत कारवाया झाल्या आहेत. तसेच मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हॉटेल पवन धाम येथे पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांनी देहव्यापाराचा पर्दाफाश केला आहे.
बाहेरच्या राज्यातून, जिल्ह्यातून आलेले गुन्हेगार आणि त्यांना आश्रय देणारे याचाही तपास हाती घेण्यात आला आहे. भाड्याने दिलेल्या प्रत्येक खोलीतील कुटुंबाचे सर्वेक्षण नगरपालिकेने सुरू आहे. या मोहिमेच्या भीतीने अनेक गुन्हेगारांना पळता भुई कमी झाली आहे. शिर्डी शहर गुन्हेगार व गुन्हेगारीमुक्त करण्याचा संकल्प आम्ही पूर्ण करून दाखविणार असल्याचा निर्धार शिर्डी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अभय शेळके पाटील यांनी ‘नवराष्ट्र ‘शी बोलताना व्यक्त केला.
वेश्या व्यवसायामुळे शिर्डीची बदनामी वाढत आहे. याला प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांनी हॉटेल चालकांवर कठोर कारवाईचे धोरण आखले आहे. त्यामुळे अनेक हॉटेल चालक आणि मालकांचे धाबे दणाणले आहेत. वैश्या व्यवसाय करणारे हॉटेल सील करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. या प्रकरणी हॉटेल मालक गोविंद गरुड, या व्यवसायात पार्टनर असलेली लता चव्हाण यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर बाललैंगिक अत्याचार, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिस निरीक्षक रणजित गलांडे यांनी एका हॉटेलवर पिटा अंतर्गत गणेश कानडे व त्याचा साथीदारावर पहिली कारवाई केली आहे. यामध्ये आरोपीला एक वर्ष जामीन मिळत नसून हा मिनी मोक्का मानला जातो. शिडीत येणाऱ्या भाविकांच्या गाड्या अडवून त्याना पार्किंग, हार प्रसाद घेण्यास बळजबरी करणाऱ्या एजंटच्या मुसक्या आवळण्याचे आदेश अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिले आहेत. एकूणच शिर्डी पोलिस स्टेशन अलर्ट मोडवर आहे. पोलिसांच्या या कारवाईचे शिडीं ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे. भाविकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.






