चेन्नईमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सहल ठरली जीवघेणी; एकाचा बुडून मृत्यू, तर एक अद्याप बेपत्ता
Maharashtra Student Death In Chennai: महाराष्ट्रातून चेन्नईला सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या गटावर काळाने घाला घातला आहे. शनिवारी चेन्नईतील प्रसिद्ध गोल्डन बीच’ वर फिरण्यासाठी गेले असताना समुद्राच्या अक्राळविक्राळ लाटांच्या प्रवाहात दोन विद्यार्थी वाहून गेले. या हृदयद्रावक घटनेत एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला असून, दुसरा अद्याप बेपत्ता आहे. शोधमोहीम राबवल्यानंतर एका विद्यार्थ्याचा मृतदेह हाती लागला, तर दुसऱ्या विद्यार्थ्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलीस आणि तटरक्षक दलाचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा हा गट पर्यटनासाठी चेन्नईला गेला होता. आनंदाने सुरू झालेली ही पिकनिक ट्रिपवर या अपघातामुळे अत्यंत दुःखात परिवर्तीत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या विविध भागांतील २६ विद्यार्थ्यांचा एक गट तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे सहलीला गेला होता. शनिवारी हा गट समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी पोहोचला. गटातील फक्त तीन विद्यार्थी समुद्रात उतरले तेव्हा एका मोठ्या लाटेच्या प्रवाहात वाहून गेले. भंडारा जिल्ह्यातील रहिवासी मयुरी चौधरीचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघातानंतर लगेचच बचाव कार्यास सुरूवात झाली. गटातील एक विद्यार्थी राज केदारी याला सुरक्षितपणे वाचवण्यात आले. पण जय पाटील हा विद्यार्थी अद्याप बेपत्ता आहे. बचाव पथके कसून शोध घेत आहेत. जय पाटीलचे कुटुंब चेन्नईत पोहोचले आहे, तर मयुरी चौधरीचे नातेवाईकही चेन्नईला पोहचण्यासाठी रवाना झाले आहेत.
यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे माहिती देताना त्यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच त्यांनी तामिळनाडू सरकारशी तात्काळ संपर्क साधला. बेपत्ता विद्यार्थ्यांसाठी शोध आणि बचाव कार्य जलद करण्यासाठी सर्व शक्य ती मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी तामिळनाडू प्रशासनाला केले आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या (सीएमओ) निवेदनानुसार, फडणवीस वैयक्तिकरित्या मदत कार्यावर लक्ष ठेवून आहेत आणि महाराष्ट्र राज्य प्रशासन बाधित कुटुंबांशी सतत संपर्कात आहे. मयुरी चौधरी यांच्या निधनाबद्दल फडणवीस यांनी तीव्र शोक व्यक्त केला आणि तिच्या कुटुंबियांना सांत्वन दिले. या विद्यार्थ्यांनी कोणत्या विशिष्ट शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेतले हे सध्या स्पष्ट नाही, परंतु प्रशासन सर्व आवश्यक माहिती गोळा करण्यासाठी आणि बाधित कुटुंबियांना मदत करण्यासाठी काम करत आहे.






