इस्लामपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : इस्लामपूर शहरातील उपनगरात मंगळवारी (ता. 1) व बुधवारी (ता. 2) सलग दोन मध्यरात्री सराईत चोरट्यांच्या टोळीने धुमाकूळ घातला. या चोरट्यांनी सलग दोन दिवसांत १५ घरे फोडली.
मंगळवारी रात्री ५ ते ६ जणांच्या टोळीने उरुण परिसर व उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागील तलाठी कॉलनी जवळपास १० हून अधिक घरे फोडण्याचा प्रयत्न केला. तर बुधवारी पहाटे जिजाऊनगर येथे अज्ञातांनी चार घरे फोडून रोख रक्कम २५ हजार व एलसीडी टीव्हीसह साहित्य चोरीला गेले आहे.
मंगळवारी पहाटे एका घरातून देवीच्या अंगावरील दागिने वगळता चोरट्यांच्या हाताला काही लागले नाही. उरुणातील डॉ. विश्वास पाटील यांच्या बंगल्यातही चोरांनी धुडगूस घातला. मंगळवारी मध्यरात्रीनंतर दीड-दोनच्या सुमारास तलाठी कॉलनीत चोरटे घुसले होते. तेथील काळे यांचा बंगला फोडण्याचा प्रयत्न झाला.
तसेच इतरही काही घरे चोरट्यांनी टिपली. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही. तेथून ही टोळी उरुण परिसरातील उदय चौकात आली. येथे भरवस्तीत आणि रस्त्याकडेला डॉ. विश्वास पाटील खेडकर यांचा बंगला आहे. पाटील यांच्या बंगल्यात खालच्या बाजूस त्यांचे रुग्णालय आहे. बंगल्यात प्रवेश केल्यावर चोरट्यांनी तेथील सीसीटीव्ही कॅमेरे फिरवून टाकले. पाटील कुटुंबीय जागे झाले. सगळीकडच्या लाईट सुरू केल्यावर चोरट्यांनी पलायन केले.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हत्यारबंद चोरटे कैद
डॉ . पाटील यांच्या बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत. मात्र, चोरट्यांनी फक्त डोळे उघडे ठेवण्याची चलाखी केली होती. हातमोजे घातले होते. तसेच त्यांच्याकडे लोखंडी कटावणी, धारदार शस्त्र आणि काठ्या होत्या. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण आहे.
बिबट्याची दहशत आणि चोरट्यांनी साधली संधी
सोमवारी रात्री जिजाऊनगर परिसरात बिबट्या आला होता. त्यामुळे रात्री कोणी घराबाहेर पडत नव्हते. याच परिसरात बुधवारी पहाटे जिजाऊनगर एका इमारतीत चार घरात कडी उचकटून घरात प्रवेश करत चोरी झाली. येथे अरविंद काळे यांचे रोख २५ हजार, किसन रामचंद्र जाधव यांचा भिंतीवर लावलेला एलसीडी टीव्ही, राजेंद्र लालचंद ओसवाल यांच्या घरातील चांदीच्या मूर्ती, कृष्णात पवार यांच्या घरात काही हाती लागले नाही. हे चारही कामगार इस्लामपुरात कलापी दुकानात कामगार आहेत. त्यांनी एकत्रित घरे घेतली आहेत. एक महिन्यापूर्वी वास्तुशांती घालून ते आज चौघेही राहायला येणार होते. तोपर्यत चोरट्यांनी घरे फोडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.