Prakash Ambedkar
परवा एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांना काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत तासभर बाहेर ताटकळत ठेवले. तिथेच ’वंचित’च्या महाविकास आघाडीतील सहभागाबाबत माशी शिंकली. येणार्या काही काळ महाविकास आघाडीच्या बैठकी होतील, चर्चा होतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेनेशीही ’वंचित’च्या जागांबाबत वाटाघाटी होतील. महाविकास आघाडीच्या तीन चाकांना आंबेडकरांचे चौथे चाक येऊन मिळेल, असे वाटेल. पण कोणत्या क्षणी काय होईल आणि प्रकाश आंबेडकर स्वबळाचा नारा देऊन आपली ’एकला चलो रे’ भूमिका जाहीर करतील, हे काही कोणाला सांगता येणार नाही. त्यामुळे जोपर्यंत प्रत्यक्ष प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीतील सहभागाबद्दल स्वतः जाहीर करत नाहीत, किंवा तसे जागावाटप होत नाही, तोपर्यंत या केवळ चर्चाच असणार आहेत.
प्रकाश आंबेडकर गेल्या चार दशकांपासून राजकारणात अनेक प्रयोग करीत आहेत. विदर्भात त्यांनी रिपब्लिकन शक्तीला बहुजन महासंघाची जोड दिली. मायावती यांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या कितीतरी आधी प्रकाश आंबेडकर यांनी ‘अकोला पॅटर्न’ तयार केला होता. त्यांच्या या अकोला पॅटर्नने तीन मंत्रीपदे त्यांच्या पक्षाला मिळाली होती. सत्तेतील सहभाग वाढला होता. राज्याच्या पातळीवर एकाच पंचवार्षिकात त्यांना यश मिळाले पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय रिपब्लिकन पक्ष आणि बहुजन महासंघाला चांगले स्थान मिळत गेले. शिवाय या पॅटर्नने एक – दोन आमदार निवडून दिले.
गावागावातील रिपब्लिकन मतांची बहुजन मतांसोबत मोट बांधणे आणि निवडणुकीच्या समिकरणात यश मिळविणे, असा हा पॅटर्न होता. रिपब्लिकन मतांवरील प्रकाश आंबेडकर यांची पकड लक्षात घेता बहुजन समाजातील अठरा पगड जातींचे पुढारी त्यांच्याशी जुळले होते. कुठेतरी जिल्हा परिषद, पंचायत समिती अगदीच ग्रामपंचायत मिळावी, यासाठी अशा गावपुढार्यांची गर्दी झाली. विदर्भात विशेषतः वर्हाडात या पॅटर्नने दहा – पंधरा वर्ष राजकारण गाजवले. रिपब्लिकन मते रिपब्लिकनेतर उमेदवाराला पूर्णपणे ट्रान्स्फर होत होती. पण ज्याठिकाणी रिपब्लिकन उमेदवार आहे, त्या उमेदवाराला बहुजन मते ट्रान्स्फर करू शकणारे बहुजनांचे नेतृत्व आंबेडकरांकडे नव्हते. आजही नाही. त्यामुळे त्यांच्या या पॅटर्नचा लाभ अनेकांना झाला पण आंबेडकरी चळवळीत काम करणारे कार्यकर्ते सत्तेपासून, निवडणुकीतील यशापासून वंचित राहिले. स्वतः आंबेडकरांना निवडणुकीत यश मिळविणे शक्य झाले नाही. आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्येच त्यातून नाराजी व्यक्त व्हायला लागली आणि अखेर भारिप – बहुजन महासंघाचा हा प्रयोग आटोपता घेण्यात आला.
गेल्या निवडणुकीच्या वेळी सत्तेपासून वंचित असलेले आंबेडकरी अनुयायी, लहान -लहान समाजघटक आणि मुस्लिम अशी मोट प्रकाश आंबेडकर यांनी बांधली. रिपाइं आणि एमआयएम यांच्या प्रमुख सहभागाने वंचित बहुजन आघाडी स्थापन झाली. एकीकडे गलितगात्र झालेली काँग्रेस, दुसरीकडे आक्रमकपणे मुस्लिम तरुणांना चिथवणारे ओवैसी बंधू आणि इतर कुठलाही पर्याय दिसत नसल्याने मुस्लिम मतदार बर्यापैकी या आघाडीकडे आकर्षित झाले. त्यातून वंचित बहुजन आघाडीची शक्ती वाढली. गेल्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला महाराष्ट्रात २७ टक्के मते मिळाली तिथे वंचित बहुजन आघाडीने १४ टक्के मते घेतली. राज्यातील लोकसभेच्या सगळ्या ४८ जागा वंचित आघाडीने लढविल्या होत्या. पैकी संभाजीनगरच्या जागेवर एमआयएमचे उमेदवार इम्प्तीयाज जलील विजयी झाले. तर सहा ते सात ठिकाणी आंबेडकर आणि एमआयएमचे उमेदवार दुसर्या स्थानावर राहिले. तेवढ्याच मतदारसंघात वंचित आघाडीच्या उमेदवाराने घेतलेल्या मतांमुळे निकाल बदलल्याचे दिसून आले. पण पुन्हा इथेही अकोला पॅटर्नप्रमाणेच आंबेडकरांच्या पदरी निराशाच आली. मुस्लिम मते पूर्णपणे आंबेडकरांकडे ट्रान्स्फर करू शकणारा नेता त्यांना मिळालाच नाही. प्रकाश आंबेडकर यांच्याबाबतीत हेच नेहमी घडले आहे. त्यांच्याकडे असलेली मते ते पूर्णपणे कोणत्याही उमेदवाराच्या पाठीशी उभी करू शकतात. पण ज्या बहुजन समाजाला सोबत घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, तो समाज वेगवेगळ्या नेत्यांच्या पाठीशी एकवटलेला असल्यामुळे इतर समाजाची एकगठ्ठा मते आंबेडकरांच्या किंवा बहुजनएतर समाजाच्या उमेदवाराच्या पाठीशी उभी राहत नाहीत.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर आपल्या सोबत असावेत असे उद्धव ठाकरे यांना वाटते आहे. महाविकास आघाडीत असले तरीही उद्धव ठाकरे एकटे आहेत. त्यांना कोणावर विसंबून चालणार नाही. त्यामुळे बाळासाहेबांनी दिलेला शिवशक्ती – भिमशक्तीचा नारा पुन्हा देण्याचा ठाकरेंचा प्रयत्न आहे. प्रत्येक मतदारसंघात दलित मते प्रभावी आहेत. ती विखुरलेली आहेत. प्रकाश आंबेडकर सोबत आले तर ती मते शिवसेनेकडे खेचता येतील, असा विचार त्यामागे असावा. आंबेडकर यांच्या महाविकास आघाडीतील सहभागावर राष्ट्रवादी काँग्रेसची काही विशेष भूमिका नाही. कारण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या प्रभाव क्षेत्रात त्यांना आंबेडकरांकडून फारशी अपेक्षा नक्कीच नसावी. पण इथे मुख्य प्रश्न आहे महाविकास आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचा. काँग्रेसला आंबेडकर चालणार नाहीत. राज्यातील नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीकडे असलेल्या मतांसाठी आंबेडकरांशी जुळवून घेण्याची तयारी दर्शविली तरीही काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडून आंबेडकर स्विकारले जाणार नाहीत. त्यामुळेच वारंवार प्रकाश आंबेडकर केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करण्याचे म्हणत आहेत.
परवाचा किस्सा वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील सहभागाच्या शक्यतेवर पुरेपुर प्रकाश टाकणारा आहे. वंचित आघाडीकडून डॉ. पुंडकर महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चेला गेले. त्यांनी आघाडीतील सहभागाबाबत प्रस्ताव दिल्यानंतर ‘तुम्ही बाहेर बसा, आम्ही चर्चा करून तुम्हाला बोलावतो’ असे त्यांना सांगण्यात आले. डॉ. पुंडकर यांना म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या प्रतिनिधीला महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी ताटकळत ठेवले. त्यानंतरचा घटनाक्रम सगळ्यांनी ‘लाईव्ह’ पाहिला. अखेर काँग्रेसने आंबेडकर यांना पत्र दिले. पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले केवळ पत्र देतात, त्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करू, अशी भूमिका आंबेडकरांनी घेतली. महाविकास आघाडीकडून जागावाटपाबाबत प्रस्ताव आल्यानंतर त्यावर चर्चा करू, असेही आंबेडकर म्हणाले. या घडामोडी पाहता आंबेडकर महाविकास आघाडीत यावेत, यासाठी केवळ उद्धव ठाकरे प्रयत्न करीत आहेत. काँग्रेसने आंबेडकरांच्या दबावात पत्र दिले असले, तरीही त्यांना वंचित बहुजन आघाडी सोबत नको आहे, हे स्पष्ट आहे. प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा सुजात सध्या राजकारणात चाचपडतोय. सामाजिक आणि राजकीय नेतृत्व सिद्ध करण्यासाठी बराच मोठा संघर्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. आंबेडकर असल्यामुळे त्यांना सामाजिक नेतृत्व सिद्ध करणे फारसे कठीण नव्हते. पण राजकीय यशासाठी अजुनही त्यांचा संघर्ष सुरु आहे. येणार्या काळात सुजात यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व सोपवायचे असेल, तर त्यांनाही प्रकाशरावांच्याच राजकीय संघर्षाच्या मार्गावरुन चालावे लागू नये, अशी चळवळीतील काही कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीन काँग्रेसशी जुळवून घेत महाविकास आघाडीत जागा मिळवावी, असे त्यांच्या निकटवर्तीयांना वाटते. पण कार्यकर्त्यांच्या भावनांवर राजकीय निर्णय होत नसतात. आंबेडकरांच्या पक्षात तर नाहीच नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून झालेला आपल्या प्रतिनिधीचा अपमान आंबेडकर विसरतील, असे अजिबात वाटत नाही. त्यामुळे येणार्या काळात महाविकास आघाडीशी जागावाटपाच्या चर्चा सुरु असताना वंचित बहुजन आघाडीने स्वबळाचा नारा दिला तरी फारसे आश्चर्य वाटणार नाही.
– विशाल राजे