बारामतीतूनच अजित पवार पराभूत होणार
मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकींमध्ये भाजपला केवळ नऊ जागांवर समाधान मानावे लागले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ४८ पैकी २३ जागा मिळाल्या होत्या. लोकसभेतल्या पराभवावरून आता महायुतीत आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्य राष्ट्रवादीत धुसफूस सुरू झाली आहे.
भाजप आणि शिंदे गटाकडून अजित पवार यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही अजित पवार यांच्या गटातूल आमदारांकडून केला जात आहे. त्यामुळे वेगळा विचार करण्याचा अप्रत्यक्ष इशारा अजित पवार यांच्या आमदारांकडून दिला जात आहे. त्यामुळे दादांच्या पक्षात नेमकं चाललयं काय, याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनाझर या मासिकात महायुतीच्या पराभवाची कारणे सांगण्यात आली होती. यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला महायुतीत घेतल्यानेच भाजपचा पराभव झाल्याचे सांगत आरएसएसने भाजपचा समाचार घेतला. इथेच वादाची ठिणगी पडली. आरएसएसने कान टोचल्यानंतर महायुतीत धुसफूस सुरू झाली.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीमुळे फटका बसल्याची चर्चा भाजपच्या अंतर्गत वर्तुळात दबक्या आवाजात सुरू झाली. दुसरीकडे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमुळे भाजप आणि शिंदे गटाला निवडणुकीत फायदा झाल्याचा दावा केला. इतकेच नव्हे तर, जर हे आरोप थांबले नाहीत तर आम्हाला वेगळा विचार करावा लागले. असा इशाराही त्यांनी दिला.
भाजपने मात्र यावर कोणतीही भूमिका न घेता मौन बाळगणे पसंत केले. त्याचबरोबर नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांच्यावरही मिटकरींच्या या विधानावर खुलासा करण्याची वेळ आली. महायुतीत सर्व काही सुरळीत सुरू आहे आणि मिटकरींना समज दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पण दुसरीकडे मात्र काही वेगळेच सुरू असल्याच्याही चर्चा आहेत. आरएसएसने केलेल्या टिकेमुळे अजित पवारांच्या गटात मोठी अस्वस्थता असल्याचेही बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला सर्वाधिक नुकसान होऊनही त्यांनाच जबाबदार धरले जात असल्याने त्यांच्या गटात अशांतता असल्याची सांगितले जात आहे.