मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू
प्रत्येक महिन्यातील चार ते पाच दिवस सर्वच महिलांना मासिक पाळी येते. मासिक पाळीच्या चक्रात प्रत्येक महिन्याला काहींना काही बदल होत असतो. मासिक पाळी कधी तारखेच्या आधीच येते तर कधी तारखेच्या नंतर येते. सणावाराच्या दिवसांमध्ये महिला मासिक पाळीच्या समस्येने त्रस्त असतात. सणाच्या दिवशी किंवा कोणत्याही कार्यक्रमात पाळी येऊ नये, म्हणून अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. यासाठी आहारात बदल केला जातो. पपईचे सेवन, लवंग खाणे तर कधी अतिउष्ण पदार्थांचे सेवन केले जाते. हे उपाय केल्यानंतर मासिक पाळी लवकर येते असे अनेकांना वाटते. घरगुती उपाय करूनसुद्धा मासिक पाळी आली नाही की महिला, मुली मेडिकलमध्ये उपलब्ध असलेल्या हानिकारक गोळ्यांचे सेवन करतात. पाळी पुढे ढकलण्यासाठी अनेक वेगवेगळ्या गोळ्या खाल्ल्या जातात.(फोटो सौजन्य – istock)
मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या खाणे अतिशय सामान्य झाले आहे. पण चुकीच्या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतात. सण उत्सवाच्या दिवसांमध्ये मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या खाल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. याबद्दल डॉ. विवेकानंद यांनी रिबुटींग द ब्रेन या पॉडकास्टवर त्यांनी धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या खाल्यामुळे एका १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या खाल्ल्यानंतर एक १८ वर्षीय मुलगी पायांना सूज आल्यामुळे डॉक्टरांकडे गेली होती. त्यानंतर डॉक्टरांनी तिची तपासणी केली. तेव्हा तिच्या पाय आणि मांड्याना सूज आली होती. तिला Deep vein thrombosis या आजाराची लागण झाली होती. मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी सलग तिने तीन गोळ्या खाल्ल्या होत्या. त्यामुळे तिच्या शरीरावर साईड इफेक्ट दिसून आले होते.
डॉक्टरांनी मुलीच्या वडिलांना सांगितल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यानंतर तिची प्रकृती आणखीनच खालावली. तिचा श्वास बंद झाला. त्यानंतर तिला डॉक्टरनी तपासले आणि मृत घोषित केले. पालकांच्या निष्काळजीपणामुळे आणि चुकीच्या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे १८ वर्षीय मुलीला जीव गमवावा लागला. त्यामुळे डॉक्टर कायमच मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या खाऊ नये, असा सल्ला देतात.मासिक पाळी लवकर येण्यासाठी तुम्ही घरगुती पदार्थांचे सेवन करू शकता.
वारंवार मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे वारंवार चेहऱ्यावर पिंपल्स येणे, मुरूम येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय त्वचेसंबंधित समस्या उद्भवून त्वचा अतिशय खराब होऊन जाते. मासिक पाळीत घेतल्या जाणाऱ्या गोळ्या शरीराच्या हार्मोन्सवर थेट परिणाम करतात. याशिवाय सतत उलट्या होणे, मळमळ होणे किंवा पोटात अस्वस्थपणा जाणवू लागतो. स्तनांमध्ये वेदना किंवा सूज आल्यानंतर महिलांना खूप जास्त शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे मासिक पाळी पुढे ढकलणाऱ्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे टाळावे.