
"मला मुलगी व्हायचंय..." दरवर्षी ३०० तरुण बदलताहेत स्वतःचं लिंग; AIIMS च्या रिपोर्टमधील आकडेवारीने खळबळ (Photo Credit- X)
एम्समधील डॉक्टरांच्या मते, दरवर्षी अंदाजे ३०० नवीन रुग्णांची या क्लिनिकमध्ये नोंदणी होत आहे, तर सुमारे ६०० रुग्ण नियमितपणे उपचार घेत आहेत. हे असे युवक आहेत जे शारीरिकदृष्ट्या सामान्य मुलगा किंवा मुलगी म्हणून जन्माला आले, परंतु जसजसे ते मोठे झाले, तसतसे त्यांना आपली ‘लिंग ओळख’ (Gender Identity) शरीरापेक्षा वेगळी असल्याचे जाणवू लागले. या मानसिक अवस्थेला वैद्यकीय भाषेत ‘जेंडर डायस्फोरिया’ म्हटले जाते.
एम्सच्या एंडोक्राइनोलॉजी विभागाचे प्राध्यापक राजेश खडगावत यांनी सांगितले की, लिंग बदलण्याची प्रक्रिया थेट शस्त्रक्रियेने सुरू होत नाही.
मुलीपासून मुलगा होणे: अशा रुग्णांना पुरुष हार्मोन्स दिले जातात, ज्यामुळे त्यांच्या शरीरावर दाढी-मिशा येणे आणि आवाज बदलणे सुरू होते.
मुलापासून मुलगी होणे: यामध्ये स्त्री हार्मोन्सच्या मदतीने शरीराची ठेवण बदलली जाते. एम्समध्ये हार्मोन थेरपी, मानसिक आरोग्य चाचणी आणि शस्त्रक्रिया या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध आहेत.
लिंग बदलण्याचा निर्णय हा केवळ शारीरिक नसून मानसिकदृष्ट्याही मोठा असतो. मानसोपचार विभागाचे प्रमुख प्राध्यापक प्रताप सरण यांच्या मते, कोणत्याही रुग्णावर थेट शस्त्रक्रिया केली जात नाही. किमान एक वर्ष त्या व्यक्तीवर देखरेख ठेवली जाते. या काळात त्या व्यक्तीला समाजातील वावर आणि मानसिक बदलांना सामोरे जावे लागते. जेव्हा डॉक्टर खात्री करतात की रुग्ण मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तयार आहे, तेव्हाच शस्त्रक्रियेसाठी हिरवा कंदील दिला जातो.
लिंगबदलाची शस्त्रक्रिया ही अत्यंत गुंतागुंतीची आणि खर्चिक असते. यामध्ये प्लास्टिक सर्जनद्वारे शरीराच्या अवयवांची पुनर्बांधणी केली जाते. मात्र, केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेमुळे आता या महागड्या शस्त्रक्रिया सोप्या झाल्या आहेत. ट्रान्सजेंडर समुदायासाठी या योजनेत विशेष तरतूद करण्यात आल्याने गरिबांनाही आपली नवीन ओळख मिळवणे शक्य झाले आहे.