
फोटो सौजन्य - Social Media
समुद्रकिनाऱ्यावर दूरदूरपर्यंत माणसाचा मागमूस नव्हता. फक्त प्रचंड लाटांचा आवाज, अंगाला झोंबणारा गार वारा आणि विचित्र शांतता. मॉन्टी वाळूत आडवा पडला. राणू आणि मिराज समुद्रासमोर बसून ड्रिंक करू लागले. तर दीप आणि आधीपासूनच घाबरलेला पिंटू अनवाणी पायांनी किनाऱ्यावर फेरफटका मारत होते. अचानक पिंटू जागच्या जागी थबकला. त्याचे डोळे विस्फारले, तो दोन पावलं मागे सरकला आणि जोरात किंचाळला. दीपने समोर पाहिलं तर वाळूत काळ्या कपड्यात गुंडाळलेलं एक गाठोडं पडलेलं होतं. त्याला हसू आलं. त्याने बाकीच्या मित्रांना बोलावलं. राणूने तो काळा कपडा उघडला आणि आतलं दृश्य पाहून सगळ्यांच्याच अंगावर शहारे आले. आत काळी बाहुली, लिंबू, कुंकू, काळे दोरे, तांदूळ, लवंगा आणि राखेत रेखाटलेली विचित्र चिन्हं होती. जणू कुणीतरी तिथे काळी विद्या केली होती. क्षणभर पाचही जण नि:शब्द झाले. राणूने संतापाच्या भरात ते गाठोडं दूर फेकून दिलं. पण काळी बाहुली त्याच्या पायाजवळच येऊन पडली. तो हसत म्हणाला, “या सगळ्या अंधश्रद्धा आहेत.” आणि त्याने त्या बाहुलीला जोरात लाथ मारली. बाहुली हवेत उडाली आणि थेट समुद्राच्या काळ्याकुट्ट लाटांमध्ये जाऊन नाहीशी झाली. त्याच क्षणी समुद्राच्या लाटा शांत झाल्या… वारा थांबला… आणि संपूर्ण समुद्रकिनाऱ्यावर काही क्षणांसाठी भयाण शांतता पसरली.
घाबरलेले सगळे पुन्हा त्या ठिकाणी आले जिथे त्यांनी दारूची बाटली ठेवली होती. बाटली तिथेच होती, पण काही मिनिटांपूर्वीच उघडलेली ती बाटली पूर्ण रिकामी झाली होती. राणू आणि मिराज एकमेकांकडे पाहू लागले. इतक्यात दूरवरून ढोलाचा मंद आवाज ऐकू येऊ लागला. ढम… ढम… ढम… समुद्रकिनाऱ्यालगतच्या नारळाच्या बागेतून मशालींचा उजेड दिसू लागला. काही क्षणांतच दहा-पंधरा जणांची एक मिरवणूक ढोल-ताशांच्या आवाजात समुद्राच्या दिशेने येताना दिसली. सगळे नाचत होते, पण त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. मिराजने मोबाईल काढून व्हिडिओ सुरू केला. पुढच्याच क्षणी त्याच्या तोंडून किंकाळी फुटली. प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यावर ती मिरवणूक किमान सातशे मीटर दूर होती. पण मोबाईलच्या स्क्रीनवर मात्र ती फक्त दहा पावलांवर उभी दिसत होती. एवढंच नाही, तर त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर डोळ्यांच्या जागी फक्त काळी, खोल पोकळी दिसत होती.
“पळा…!” मिराज ओरडला आणि पाचही जण जीवाच्या आकांताने धावू लागले. पण ते जितके वेगाने पळत होते, तितकीच ती मिरवणूक त्यांच्या जवळ येत होती. जणू समुद्रकिनारा संपतच नव्हता. काही वेळाने दमून दीपने धाडस करून मागे पाहिलं आणि त्याच्या पायाखालची वाळूच सरकली. आधी दहा-पंधरा जणांची दिसणारी ती मिरवणूक आता शेकडो लोकांमध्ये बदलली होती. आणि त्या गर्दीच्या अगदी पुढे… त्यांना एक ओळखीचा चेहरा दिसला… राणू! तो त्या मिरवणुकीसोबत वेड्यासारखा धावत होता. त्याचे डोळे पूर्ण पांढरे झाले होते, चेहऱ्यावर विकृत हास्य होतं आणि तो थेट त्यांच्या दिशेने धावत येत होता. दीपने घाबरून आपल्या शेजारी पाहिलं… त्याच्यासोबत फक्त पिंटू, मॉन्टी आणि मिराज उभे होते. राणू त्यांच्यात नव्हताच! म्हणजे जो काही वेळापूर्वी त्यांच्यासोबत धावत होता… तो नेमका कधी गायब झाला? हा विचार पूर्ण होण्याआधीच मशालींचा प्रकाश त्यांच्या अंगावर पडला, ढोलांचा आवाज कान फाडू लागला आणि चौघांच्याही डोळ्यांसमोर अंधार पसरला.
सकाळी स्थानिक लोकांना समुद्रकिनाऱ्यावर चार तरुण बेशुद्ध अवस्थेत आढळले. शुद्धीवर आल्यावर त्यांनी राणूबद्दल विचारलं. पोलिसांनी संपूर्ण समुद्रकिनारा पालथा घातला, समुद्रात शोधमोहीम राबवली, पण राणूचा कोणताही मागमूस सापडला नाही. फक्त ज्या ठिकाणी काळी बाहुली समुद्रात फेकली होती, तिथे ओल्या वाळूत एकच पाऊलखूण दिसत होती… ती समुद्राच्या दिशेने जात होती… पण परत येणारी एकही नव्हती.
(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)