एएमएल स्पष्टीकरण! निदान आणि उपचार प्रवासाचे विश्लेषण
मुंबई.आजच्या वेगवान जीवनात आपण अनेकदा अशक्तपणा किंवा तापासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो, त्यांना दैनंदिन ताण किंवा थकव्याची सामान्य चिन्हे मानतो. ही लक्षणे एखाद्या मोठ्या समस्येची सुरुवातीची चिन्हे असू शकतात, हे आपण अनेकदा ओळखत नाही. ॲक्यूट मायलोइड ल्युकेमिया (AML), जो रक्ताच्या कर्करोगाचा एक गंभीर आणि जीवघेणा प्रकार आहे, अशा रुग्णांसाठी वरवर साध्या दिसणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. एएमएल हा प्रौढांमध्ये आढळणारा रक्ताच्या कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे, जो वेगाने वाढतो आणि ज्याचा सामान्यतः अंदाज प्रतिकूल असतो. 1990 ते २०२१ या काळात एएमएलच्या रुग्णांची संख्या 79,372 वरून 1,44,645 पर्यंत वाढली, म्हणजेच त्यात तब्बल 82.33 % वाढ झाली. त्याचप्रमाणे, मृत्यूंच्या संख्येतही सुमारे 73.88 % वाढ होऊन ती 1.3 लाखांपेक्षा जास्त झाली आहे.(फोटो सौजन्य – istock)
महत्त्वाचे म्हणजे, एएमएलच्या घटनांमध्ये सर्वाधिक वाढ झालेल्या पहिल्या तीन देशांमध्ये भारताचा समावेश होतो. या दुर्लक्षित आजाराबद्दल जागरूकता वाढवणे अत्यंत आवश्यक आहे, ज्यामुळे मृत्यू कमी करता येतील. रुग्णांना आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांना निदान आणि उपचार पर्यायांबद्दल माहिती दिल्याने त्यांना आरोग्यसेवेसंबंधी योग्य निर्णय घेण्यास मदत मिळते.रक्ताच्या कर्करोगावर डॉ. श्रीनाथ क्षीरसागर प्रमुख, क्लिनिकल ट्रायल रिसर्च युनिट आणि संशोधन केंद्र यांनी सविस्तर माहिती सांगितली आहे.
हाडं ठिसूळ झाल्याने कधीही शरीराचा होईल सांगाडा, Bone Cancer ची 6 लक्षणं दिसताच गाठा हॉस्पिटल
एएमएल हा एक प्रकारचा कर्करोग आहे जो रक्त आणि अस्थिमज्जा यांवर परिणाम करतो. आपल्या अस्थिमज्जेमध्ये ‘मदर सेल्स’ (Stem Cells) असतात, ज्या शरीराच्या गरजेनुसार रक्तातील सर्व पेशींमध्ये रूपांतरित होतात. यामध्ये लाल रक्तपेशी (Oxygen वहन करणाऱ्या), प्लेटलेट्स (रक्त गोठण्यास मदत करणाऱ्या) आणि पांढऱ्या रक्तपेशी (संक्रमणाशी लढणाऱ्या) यांचा समावेश असतो. एएमएलमध्ये, मायलोइड स्टेम पेशींमध्ये जनुकीय बदल होतात, ज्यामुळे त्यांची वाढ अनियंत्रित होते आणि त्या अपरिपक्व किंवा असामान्य पेशी तयार करतात. या ब्लास्ट पेशी निरोगी पेशींना बाजूला सारतात आणि गुंतागुंत निर्माण करतात. एएमएलची काही लक्षणे खूप सामान्य वाटू शकतात, जसे की अशक्तपणा, थकवा, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत घट्टपणा आणि ॲनिमिया. इतर लक्षणांमध्ये अनियंत्रित रक्तस्त्राव आणि हाडांमध्ये वेदना यांचा समावेश होतो. या कर्करोगाच्या जोखमीच्या घटकांमध्ये धोकादायक रसायनांचा संपर्क, रेडिएशन आणि पूर्वीची केमोथेरपी यांचा समावेश आहे. तथापि, अनेक व्यक्तींना कोणत्याही ज्ञात जोखमीच्या घटकांशिवाय एएमएलचे निदान होते. एएमएलची विभागणी तीन प्रकारांमध्ये करता येऊ शकते: भारतात ॲक्यूट मायलोइड ल्युकेमिया (AML) च्या रुग्णांची संख्या आणि त्यामुळे होणारे मृत्यू सातत्याने वाढत आहेत. ल्युकेमियाच्या घटनेचा दर वार्षिक अंदाजे 49,883 प्रकरणे इतका आहे. 2019 मध्ये, एकूण ल्युकेमियाच्या प्रकरणांपैकी 10.5 % पेक्षा जास्त प्रकरणे एएमएलची होती. विशेष म्हणजे, महिलांपेक्षा पुरुषांमध्ये एएमएल अधिक प्रमाणात आढळतो. एएमएलचे निदान आणि उपचारांमध्ये अनेक महत्त्वाचे अडथळे आहेत, जसे की सुसज्ज सुविधांची असमान उपलब्धता आणि या आजाराबद्दल जागरूकतेचा अभाव. हे अडथळे वेळेवर निदान आणि प्रभावी उपचारांमध्ये अडथळा निर्माण करतात, ज्यामुळे मृत्यू दरात वाढ होते.
इतर सामान्य लक्षणांव्यतिरिक्त, एएमएलचे वैद्यकीय निदान अस्थिमज्जेमध्ये 20 % किंवा त्याहून अधिक ‘ब्लास्ट’ (असामान्य पेशी) च्या उपस्थितीवरून केले जाते. सखोल क्लिनिकल तपासणी, वैयक्तिक इतिहास, कौटुंबिक इतिहास, रक्तस्त्रावाचे प्रसंग आणि इतर सह-विकार यानंतर हे निदान केले जाते. खालीलपैकी अनेक प्रकारच्या चाचण्यांची आवश्यकता असू शकते: संपूर्ण रक्त गणना (CBC): या चाचणीमध्ये रक्तातील पेशींची संख्या मोजली जाते आणि ‘ब्लास्ट’ (असामान्य पेशी) उपस्थित आहेत का, हे तपासले जाते.अस्थिमज्जा ॲस्पिरेशन किंवा बायोप्सी: अस्थिमज्जेच्या द्रवाचा नमुना (ॲस्पिरेशन) किंवा घन ऊतकाचा नमुना (बायोप्सी) घेऊन जनुकीय बदल तपासले जातात.
मेंदू आणि पाठीच्या कण्याभोवतीच्या द्रवाचा नमुना (सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड) घेऊन कर्करोग पाठीच्या कण्यात किंवा मेंदूपर्यंत पसरला आहे का, हे तपासले जाते.याव्यतिरिक्त, उपचारासाठी विशिष्ट लक्ष्ये ओळखण्यासाठी इमेजिंग चाचण्या आणि जनुकीय विश्लेषणे देखील केली जाऊ शकतात. एएमएल वरील उपचार पद्धती अनेक घटकांवर अवलंबून असते, जसे की उपप्रकार, रुग्णाचे वय, संसाधनांची उपलब्धता, रुग्णाची आर्थिक परिस्थिती आणि जीवनशैलीची गुणवत्ता.
रेमिशन इंडक्शन थेरपी: या उपचार पद्धतीचा उद्देश रक्त आणि अस्थिमज्जेतील सर्व ल्युकेमिया पेशी नष्ट करणे हा असतो. पोस्ट-रेमिशन थेरपी ही थेरपी उर्वरित पेशी नष्ट करते जेणेकरून रोगाचा पुन्हा उद्रेक होऊ नये.
रुग्णांवर केमोथेरपी, रेडिएशन थेरपी किंवा टार्गेटेड थेरपी केली जाऊ शकते आणि काही विशिष्ट प्रकरणांमध्ये, केमोथेरपीनंतर अस्थिमज्जा प्रत्यारोपण केले जाते. मात्र, तीव्र स्वरूपाची केमोथेरपी सर्व रुग्णांसाठी योग्य नसते. बहुतेक वृद्ध व्यक्ती (६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे) तीव्र केमोथेरपीसाठी योग्य नसतात, कारण यामुळे दुष्परिणाम आणि आरोग्याची गुंतागुंत गंभीर रीतीने वाढण्याचा धोका असतो. अशा रुग्णांसाठी, डॉक्टर सामान्यतः कमी तीव्रतेची औषधे वापरण्याचा सल्ला देतात, ज्यांचे दुष्परिणाम कमी असतात.एएमएलचे निदान झाल्यावर कदाचित भीती आणि निराशा येऊ शकते. मात्र, त्वरित हस्तक्षेप आणि सर्वसमावेशक व्यवस्थापन हे उपचारांच्या यशाची शक्यता वाढवू शकतात. चाचणी आणि उपचार पद्धतींमधील प्रगतीमुळे जगण्याचे प्रमाण सुधारले आहे, तरीही आव्हाने कायम आहेत, विशेषतः वृद्ध रुग्णांसाठी. भविष्य आशादायक आहे, आणि एएमएल समजून घेण्याच्या प्रत्येक प्रगतीमुळे अधिक प्रभावी उपचार पद्धती आणि रुग्णांसाठी चांगल्या जीवनमानाची निर्मिती होईल.