फोटो सौजन्य: iStock
अनेकांना वाटते की सिगारेट फक्त फुफ्फुसांनाच नुकसान करत असते. जर तुम्हाला सुद्धा असेच हातात असेल तर सत्य जाणून तुम्हाला आश्चर्य बसणार आहे. खरंतर सिगारेटचा धूर संपूर्ण शरीरावर विषासारखा प्रभाव टाकतो. ज्यामुळे हृदयापासून मेंदूपर्यंत, त्वचेपासून डोळ्यांपर्यंत, कोणताही अवयव त्याच्या दुष्परिणामांपासून सुरक्षित नाही. काही क्षणांची शांतता देणारी सिगारेट तुमच्या आयुष्यातील अमूल्य वर्षे कमी करत आहे.
धूम्रपानामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, दृष्टी कमजोर होणे, अगदी अंधत्व येण्याचा धोका वाढतो. म्हणूनच आज आपण, ही एक सिगारेट शरीराच्या कोणत्या अवयवांना हानी पोहोचवते आणि ते सोडणे आरोग्यासाठी कसे वरदान ठरू शकते, त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
धूम्रपान करणाऱ्यांमध्ये हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका 2 ते 4 पट जास्त असतो. सिगारेटमधील निकोटीन रक्तवाहिन्या अरुंद करतात, ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन बिघडते. धुरातील कार्बन मोनोऑक्साइड रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी करते, परिणामी हृदयावर अधिक ताण येतो. उच्च रक्तदाब कायम राहिल्याने हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
सिगारेट स्मरणशक्ती कमी करून डिमेंशियाचा धोका वाढवते. धुरातील विषारी रसायने मेंदूच्या पेशींना हानी पोहोचवतात आणि मज्जासंस्था कमकुवत करतात. त्यामुळे एकाग्रता आणि विचारशक्ती मंदावते, तसेच स्ट्रोकचा धोका वाढतो.
सिगारेट त्वचेतील ओलावा आणि आवश्यक पोषकतत्त्वे नष्ट करते, ज्यामुळे सुरकुत्या, डाग आणि त्वचा निस्तेज दिसते. धूम्रपानामुळे कोलेजनचे उत्पादन घटते, त्वचा सैल होते आणि वयाच्या आधी वृद्धत्व दिसू लागते. ऑक्सिजनचा कमी पुरवठा झाल्याने त्वचा काळवंडते. तसेच त्वचेचे तेज हरवते.
सिगारेटमुळे किडनी कर्करोगाचा धोका 50% ने वाढतो. धुरातील विषारी घटक मूत्रपिंडाच्या ऊतींना हानी पोहोचवतात, ज्यामुळे ते हळूहळू निकामी होण्याची शक्यता वाढते. तसेच, उच्च रक्तदाबामुळे किडनी खराब होण्याचा धोका वाढतो.
सिगारेटमधील विषारी घटक डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांना हानी पोहोचवतात, परिणामी ब्लड सर्क्युलेशन मंदावते आणि दृष्टी कमी होते. सततच्या धूम्रपानामुळे मोतीबिंदू, अंधुक दृष्टी आणि वयोमानानुसार होणाऱ्या मॅक्युलर डीजनरेशन (AMD) चा धोका तिप्पट होतो, जो पूर्ण अंधत्वास कारणीभूत ठरू शकतो.
धूम्रपान केवळ तुमच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर तुमच्या आयुष्याच्या गुणवत्तेसाठीही हानिकारक आहे. त्यामुळे, आरोग्य सुधारण्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी सिगारेट सोडण्याचा आजच संकल्प करा!