
गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
पुणे : प्रत्येक घरात दिवसाची सुरुवात ही एक कप गरमागरम चहा किंवा कॉफीशिवाय होत नाही. थकवा घालवण्यासाठी, कामाच्या धावपळीत क्षणभर निवांत बसण्यासाठी किंवा मित्र-परिवारासोबत गप्पांचा आनंद घेण्यासाठी घेतला जाणारा हा कप आपल्या रोजच्या आयुष्याचा जणू एक भाग बनला आहे. मात्र, ‘जितका गरम तितका चांगला’ या समजुतीने चहा-कॉफी पिण्याची सवय नकळत आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. वाफाळता चहा किंवा कॉफी वारंवार आणि अतिउष्ण तापमानात पिण्याची सवय अन्ननलिकेवर परिणाम करू शकते आणि दीर्घकाळ कर्करोगाचा धोका वाढवू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.(फोटो सौजन्य – istock)
डेंग्यूपासून लवकर रिकव्हरीसाठी खा हे सुपरफूड; डाएटमध्ये करा या पदार्थांचा समावेश
अनेकांना वाफाळता आणि अतिशय गरम चहा-कॉफी पिण्याची सवय असते. त्यापुर्वी हे जाणून घेणे गरजेचे आहे की 65°C पेक्षा जास्त तापमानाचे अत्यंत गरम पेय वारंवार सेवन केल्यास अन्ननलिकेच्या आतील आवरणाला इजा होऊ शकते आणि दीर्घकाळासाठी अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
खूप गरम चहा किंवा कॉफी पिणे आरोग्यासाठी चांगले नाही. जागतिक आरोग्य संघटनेतंर्गत IARC ने 65°C पेक्षा जास्त तापमानाची अतिउष्ण पेये “मानवांमध्ये कर्करोग होण्याची शक्यता असलेली” (probably carcinogenic) अशी श्रेणी दिली आहे.याचा अर्थ चहा किंवा कॉफीमुळे थेट कॅन्सर होतो असे नाही. मात्र, वारंवार आणि अतिशय गरम पेय प्यायल्याने तोंड, घसा आणि अन्ननलिकेच्या आतील भागाला उष्णतेमुळे इजा होऊ शकते, त्यामुळे धोका वाढू शकतो.
अतिशय गरम पेयाचे सेवन केल्याने अन्ननलिकेच्या आतील पेशींवर वारंवार उष्णतेचा ताण आणि सूक्ष्म इजा होऊ शकते. ही सवय दीर्घकाळ कायम राहिल्यास अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पेय थोडे थंड करुनच त्याचे सेवन करणे हा साधा आणि प्रतिबंधात्मक उपाय आहे, असे डॉ. विवेक बांडे ( सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट,ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर, तळेगाव-दाभाडे) यांनी स्पष्ट केले.
अन्ननलिकेच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. गिळताना त्रास होणे, छातीत जळजळ किंवा वेदना, अन्न घशात अडकल्यासारखे वाटणे, आवाजात बदल होणे, अचानक वजन कमी होणे आणि दीर्घकाळ खोकला येणे यांसारखी लक्षणे सातत्याने जाणवत असल्यास वैद्यकीय तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
अन्ननलिकेच्या कर्करोगामध्ये लक्षणांकडे दुर्लक्ष करणे ही मोठी समस्या आहे. विशेषतः गिळताना होणारा त्रास किंवा अन्न घशात अडकल्यासारखी भावना वारंवार होत असेल, तर त्याकडे केवळ अॅसिडिटी समजून दुर्लक्ष करु नका. धूम्रपान आणि मद्यपान टाळणे, संतुलित आहाराचे सेवन करणे घेणे, नियमित आरोग्य तपासणी करणे आणि अतिउष्ण पेयांचे सेवन टाळणे यामुळे जोखीम कमी करण्याच्या दिशेने पावले उचलता येतात,असे डॉ.राम पाटील( हेड ॲण्ड नेक सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट,अपोलो स्पेक्ट्रा,पुणे) यांनी सांगितले.
तज्ज्ञांच्या मते, चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असलेल्या व्यक्तींनी उकळत्या पेयाचे लगेच सेवन न करता काही मिनिटे थांबावे. 50–60°C च्या आसपासचे तापमान तुलनेने योग्य मानले जाते. तसेच पुरेसे पाणी पिणे, संतुलित आहार घेणे आणि धूम्रपान व मद्यपान टाळणे या आरोग्यदायी सवयी अंगीकारणे आवश्यक आहे.
Japanese Bathing Culture: जपानी लोक रात्रीच आंघोळ का करतात? जाणून घ्या यामागील ‘ही’ काही खास कारणे
अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका केवळ अतिउष्ण पेयांमुळे उद्भवतो असे नाही. तंबाखूचे सेवन, मद्यपान, लठ्ठपणा, आहारातील काही घटक आणि इतर वैद्यकीय कारणेही जोखमीवर परिणाम करू शकतात. त्यामुळे चहा-कॉफी बंद करण्यापेक्षा अतिगरम चहा-कॉफी टाळा आणि असमान्य लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका हा मोलाचा सल्ला तज्ज्ञांनी दिला.
Ans: अतिशय गरम पेये वारंवार पिणे अन्ननलिकेच्या आतील आवरणाला उष्णतेमुळे इजा पोहोचवू शकते. अशा सवयीचा अन्ननलिकेच्या कर्करोगाच्या वाढलेल्या जोखमीशी संबंध आढळला आहे.
Ans: तोंड किंवा जीभ भाजेल इतके गरम पेय टाळणे योग्य. पेय थोडे थंड झाल्यानंतर घेणे सुरक्षित पर्याय आहे.
Ans: नाही. कर्करोगाचा धोका अनेक घटकांवर अवलंबून असतो. तंबाखूचे सेवन, मद्यपान, लठ्ठपणा आणि इतर जीवनशैलीशी संबंधित घटकही महत्त्वाचे असू शकतात.