
Chattrapati Shivaji Maharaj: स्वराज्याच्या आरमाराची गोष्ट; सागरी तटबंदी भक्कम असणं शिवरायांना का महत्त्वाचं वाटलं होतं?
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025: कोकण प्रांताला निसर्गाने भरभरुन सौंदर्य आणि साधनसंपत्ती दिली आहे वेळ पडलीच तर शांत असणारा हा समुद्र रौद्ररुपही धारण करेल हे छत्रपती शिवरायांनी ओळखलं होतं. जो अथांग समुद्र उपजिवीकेचं साधन आहे तोच समुद्र परकीय आक्रमणांपासून आपलं रक्षणही करु शकतो ही बाब लक्षात घेत महाराजांनी स्वराज्यातील रयतेच्या हितासाठी आरमाराची उभारणी केली.
ज्याचं समुद्रावर राज्य त्याची सत्ता, ज्याचं आरमार भक्कम त्याचं वर्चस्व. भविष्यात युद्ध हे जमिनीप्रमाणे पाण्यातही होऊ शकतं, ही दूरदृष्टी महाराजांची होती. व्यापारासाठी आलेले मुघल, पोर्तुगीज, ब्रिटीश यांनी सागरी मार्गाने येत मराठ्यांच्या भूमीत अमानुषपणे सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच जर परकिय आक्रमणांशी दोन हात करायचे असतील तर मराठ्यांची समुद्रावर सत्ता असणं महत्त्वाचं होतं. म्हणूनच महाराजांनी कोकणप्रांतात जलदुर्गांची उभारणी केली. याच कारणामुळे छत्रपती शिवरायांना द फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणजेच भारतीय नौदलाचे जनक देखील म्हटले जाते.
मुंबईचे ब्रिटीश, वसईचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्धी यांच्या कारनाम्यांवर वचक बसावा म्हणून राजांनी कोकण प्रातांत मराठ्यांच्या चौकी उभारल्या. शिवरायांच्या काळात कल्याण भिवंडी हे व्यापाऱ्याचं केंद्र होतं. खाडी असल्या कारणाने येथून पुणे, मुंबई आणि पालघर , अलिबाग या परिसारात मालाची आयात निर्यात होत असे. ही बाब लक्षात घेत राजांनी स्वराज्याच्या आरमाराची मुहुर्तमेढ कल्याण येथे रोवली. भिवंडीत किल्ले दुर्गाडी ही मराठ्यांची चौकी उभारली. या ठिकाणाहून येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांनी पाहणी आणि मराठ्यांच्या परवानगी शिवाय कोणताही व्यापार होत नसे. यामुळे ब्रिटीश, डच आणि मुघल सैन्यावर मराठ्यांची दहशत बसली होती.
जिथे समुद्र तिथे आमची सत्ता असं म्हणत कोकण प्रांतात पोर्तुगीजांची सत्ता वाढत चाचली होती. वसई ते गोव्यापर्यंत पोर्तुगीजांनी सत्ता बळकट होत होती म्हणूनच राजांनी मालवणच्या कुरटे बेटावर जलदुर्ग उभारणीचे आदेश हिरोजी इंदुलकरांना दिले. कुरटे बेटावर बांधलेला किल्ला म्हणजे किल्ले सिंधुदुर्ग होय. परकीय व्यापारांवर नजर रहावी म्हणून राजांनी मालवणच्या बेटाला आरमाराचे केंद्र बनविले. याचप्रमाणे किल्ले खांदेरी उंदेरी आणि किल्ले कुलाबा हे देखील आरमारातील मुख्य जलदुर्ग आहेत.
याचं कारण म्हणजे मुंबईचे ब्रिटीश आणि जंजिऱ्याचा सिद्धी यांचे राजकीय संबंध सलोख्याचे होते. राजांनी अनेक प्रयत्न केले मात्र शेवटपर्यंत जंजिरा मराठ्यांच्या हाती येत नव्हता. म्हणूनच ब्रिटीश आणि सिद्धी एकत्र येत स्वराज्यास कोणताही दगाफटका करु नये म्हणून राजांनी या जलदुर्गांची उभारणी केली. राजांच्या या धोरणांना निष्ठावंत मावळ्यांनी देखील तितकीच साथ दिली होती. मराठ्यांची समुद्रावर सत्ता भक्कम करण्यात सरखेल कान्होजी आंग्रे यांचा मोलाचा वाटा होता.
सागरी मार्गाने परकीय सत्ता आपल्यावर कधीही आणि कुठल्याही प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न करणार हे भविष्य महाराजांनी साडे तीनशे वर्षांपुर्वीच ओळखलं होतं. 26 नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईवर हल्ला करण्यासाठी आलेले दहशतवादी हे सागरी मार्गाने आले होते. यावरुन सागरी तटबंदी भक्कम असणं किती महत्त्वाचं आहे ही महाराजांची दूरदृष्टी आजही लागू पडते. इतिहासात अनेक राजे होऊन गेले. मात्र छत्रपती शिवाजी राजांंचं धोरण राजांची दूरदृष्टी, धर्माप्रति असलेली निष्ठा, त्यांचं शौर्य आणि रायतेवर असलेलं आभाळाभर प्रेम यामुळे शिवरायांचा इतिहास आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे.