फोटो सौजन्य: गुगल
Chhatrapati Shivaji Maharaj : “हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही तो श्रींची इच्छा”! स्वराज्यासाठी परकीय आक्रमणांशी लढताना छत्रपती शिवरायांचे विचार आणि त्यांची दूरदृष्टी इतिहासाने नोंद केली आहे. त्यातीलच एक हे एक वाक्य. शिवरायांचा इतिहास हा पराक्रमाची आणि शौर्याची गाथा सांगणारा आहे. मुठभर मावळ्यांच्या साथीने सह्याद्रीच्या या वाघाने मुघल, फ्रेेंच, पोर्गुगीज या आणि अशा अनेक परकीय सत्तांना आपल्यासमोर झुकायला लावलं. आजवर शिवरायांच्या शौर्याबद्ल त्यांच्या पराक्रमाबद्दल पोवाडा, सिनेमा, कादंबऱ्या, नाटक अशा विविध माध्यमांतून शिवरायांंच्या इतिहास सांगितला गेला आहे. शिवराय म्हटले की,युद्ध पराक्रम आणि शौर्य हे आलंच. मात्र युद्धापलिकडे देखील शिवाजी महाराजांना रयतेचा राजा का म्हटलं जातं हे शिवजयंती निमित्ताने जाणून घेऊयात.
‘रयतेच्या भाजीच्या देठासही धक्का लागता कामा नये’, असं शिवरायांचं धोरण होतं. महाराजांच्या या दूरदृष्टीबाबत आणि राजांच्या रयतेवर असलेल्या प्रेमाबाबत गोविंद पानसरे यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकात माहिती दिली आहे. शिवरायांनी रयतेला गनिमांपासून फक्त संरक्षणच नाही दिलं तर ताठमानेने जगण्याचं बळंही दिलं. गोविंद पानसरे यांनी त्यांच्या पुस्तकात नमुद केल्याप्रमाणे पुण्यात शहाजी राजे भोसले यांची जहागीरदारी होती. याच भागात मोंगल आणि आदीलशाही सैन्य उतमात करत असायचे. कित्येकदा या ठिकाणी परकीय शत्रुंचे हल्ले देखील होत असायचे. या भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांना या सगळ्याचा नाहक त्रास सहन करावा लागायचा. शेतीचं आणि शेतकऱ्यांचं होणारं नुकसान पाहता शिवरायांनी पुन्हा नव्याने गावांचं पुनर्वसन केलं.शेती हा प्रमुख व्यवसाय असून रयतेने शेतीकडे वळायला हवं म्हणून राजांनी जमीन नव्याने कसायला घेणाऱ्यांना बी बियाणांची मदत केली. रयतेने शेती करावी यासाठी प्रोत्साहन दिले. दुष्काळातील महसूल माफ केला. मन मानेल तशी वसूली करण्याचा शिरस्ता मोडून काढला.
शिवरायांच्या काळात सरकारी अधिकारी प्रत्यक्षरीत्या रयतेकडून कर वसूल करत नसे. यासाठी पाटील, खोत, महाले, देसाई, देशपांडे आणि कुलकर्णी आदी मंडळी असत. ही मंडळी सरकारी करापेक्षाही जास्त किंमत रयतेकडून वसूल करत असायची. कधी धमकावून तर कधी हत्यारं दाखवून शेतकऱ्यांची पिळवणूक करायचे. या अमानुष वसुलीवर शिवरायांनी नियंत्रण आणले. स्वराज्यात शेतकऱ्य़ांना आणि स्त्रियांना राजांनी मानाने जगण्याचं बळ दिलं. शेतकऱ्यांना सरकारी कोट्यातून शेतीची अवजारं, गुरं, आणि बी बियाणं देण्याची सोय देखील केली होती.
याबरोबर छत्रपती शिवरायांचं रयतेवर किती प्रेम होतं याची जाणीव आरमार उभारणीच्या वेळेस महाराजांनी रामचंद्रपंत अमात्य यांनी लिहिलेल्या एका पत्रातून होते. महाराजांनी रामचंद्रपंत अमात्य यांना एक आज्ञापत्र लिहिलं होतं. या पत्रात असं नमुद केलं होतं की, स्वराज्य रयतेच्या सुरक्षेसाठी असलं तरी स्वराज्य निर्मितीच्या कामात देखील रयतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. आरमार उभारणीच्यावेळी जहाज बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात लाकूडफाट्याची गरज होती. घनदाट जगलं असल्या कारणाने लाकूडफाटा मोठ्या प्रमाणात होता. तरीही महाजांनी आज्ञा केली की, स्वराज्यातील आंबा, फणस या झाडांना हातही लावू नये. याचं कारण म्हणजे, ही झाडं एक ते दोन वर्षांत मोठी होत नाही. रयतेने या झाडांना आपल्या मुलाबाळांप्रमाणे वाढवलं आहे. जर एखादे झाड अगदीच जीर्ण झाले असेल तर ते तोडण्याआधी त्याच्या धन्याची परवानगी घ्यावी आणि त्याला योग्य तो मोबदला ही दिला जावा. रयतेविषयी महाराजांना किती आपुलकी होती हे या आज्ञापत्रातून दिसून येते.
शिवरायांच्या स्वराज्यात शेतकऱ्यांना आणि महिलांना आदराने वागवलं जातं असे. अन्य राजांचे सैैन्य शेतीची नासधूस करीत असे. या सैन्यातील शिपायांचे लढाई करणं हेच एकमेव उपजिविकेचं साधन होतं. मात्र स्वराज्यातील सैनिकांची पार्श्वभूमी शेतीची होती. इतर राजांचे सैनिक महिनोंमहिने घरादारापासून लांब राहत असायचे. लढाई करणे एवढंच त्याचं काम होतंं. मात्र स्वराज्यातील हर एक मावळा शेतकरी होता. पोराबाळांत राहणारा होता. शिवरायांचे मावळे दसऱ्याला सीमोल्लंघन करुन वेस ओलांडायचे आणि अक्षय्य तृतीयेला घरी परतत शेतीच्या कामाला सुरुवात करायचे. त्यामुळे महाजारांच्या सैन्याने कधीच कोणत्या प्रदेशातील शेतकऱ्यांच्या शेतीची नासधूस केली नाही.
इतिहासात महारांनी केलेली सुरतेची लुट प्रसिद्ध आहे. मात्र तेव्हाही स्वराज्याच्या सैन्याने शेतीचे नुकसान केले नव्हते. राजांच्या सैन्यातील मावळे शेतकरी असल्याने शेती आणि शेतकऱ्यांच्या कष्टाची जाण स्वराज्याच्या सैन्याला होती. लढाईसाठी निघतााना कोण्याही प्रदेशातील शेतीची उतमात करु नये ,असा आदेशही शिवरायांनी सैन्याला दिला होता. राजा रयतेसाठी एवढं करत आहे, ही जाण देखील रयतेस होती. त्यामुळे स्वराज्यातील सैनिक रयतेस आपलेच वाटत असे. रयत सैन्याला सहाय्य करत होती आणि सैन्य परकीय आक्रमणांपासून रयतेस अभय देत असे. राज्य चालविण्यासाठी सैन्य आणि रयत यांची एकी असणं महत्त्वाचं आहे, हे छत्रपती शिवरायांनी ओळखले होते. म्हणूनच इतिहासात महाराजांना ‘रयतेचा’ राजा असं म्हटलं जातं.
(सदर लेख हा लेखक गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकातील संदर्भावर आधारित आहे.)