अनेकांना दातदुखीच्या समस्येने ग्रासलेले असते. दातांना सूज येणे, गरम किंवा थंड पदार्थ खाल्ल्याने दातात कळ येणे, अशा काही कारणांमुळे दातदुखी होऊ शकते. काही वेळा या वेदना असह्य होतात आणि मग डॉक्टरांची भेट घ्यावी लागते. अशावेळी दातांमध्ये पोकळी, मुलामा चढवणे, इन्फेक्शन, घाण हे इतके वेदनादायक असते की, अन्न चावून खाणेही कठीण होते. तसेच काहीही थंड प्यायल्याने त्रास होऊ शकतो.
दात किडणे आणि ते दुखणे हे कधीकधी सहन करण्या पलिकडले होते. याचा त्रास तुम्हाला सतत जाणवत असतो. तुमच्या झोपेवरही याचा परिणाम होतो. काही घरगुती उपायांनी तुम्ही दातदुखीपासून मुक्ती मिळवू शकता. परंतु या वेदना काही दिवस तशाच राहू शकतात. अशावेळी नेमके कारण शोधण्यासाठी दातांच्या डॉक्टरांना भेट देणे आवश्यक आहे. यावर काही घरगुती उपाय आहेत जे तुम्हाला काहीसा आराम देऊ शकतात.
लसूण दातदुखीवर नियंत्रण ठेवण्यास उपयोगी आहे. यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म वेदना कमी करतात. डेंटल प्लेकवर हे प्रभावी ठरू शकते. यासाठी उपाय म्हणून तुम्ही लसूण चहाचा वापर करु शकता किंवा लसणाची कुडी चघळू शकता. याशिवाय दुखऱ्या भागावर लसणाची पेस्टही लावू शकता. लवंगच्या तेलात युजेनॉल आणि एसिटाइल युजेनॉल असते. यामध्ये दाहक-विरोधी आणि वेदनाशामक (वेदनाशामक) फायदे असतात. त्यामुळे दात दुखत असल्यास या तेलाच्या वापरामुळे दातदुखीवर रामबाण उपाय ठरतो.
कांद्यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म तोंडातील बॅक्टेरियावर प्रभावीपणे काम करत असतात. दातदुखीवरीव घरगुती उपाय आणि नैसर्गिक औषध म्हणूनही कांद्याचा वापर होतो. तुम्हाला जर दातदुखीचा त्रास होत असेल तर कांद्याचा तुकडा दुखणाऱ्या जागेवर काही वेळ तसाच ठेवल्यास आराम मिळतो. दातांच्या समस्यांवरील एक महत्वाचा उपाय म्हणजे मीठाचे पाणी. दातदुखीवरील हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. यासाठी कोमट पाण्यात थोडे मीठ मिसळून तोंड आणि दात धुण्यासाठी वापरावे.