पिंपल्स आणि मुरुमांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? आयुर्वेदातील 'या' पदार्थाचा वापर केल्यास त्वचेवर येईल ग्लो
हल्ली कामाच्या धावपळीमध्ये महिलांसह पुरुषांना सुद्धा त्वचेची काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नाही. धूळ, माती आणि प्रदूषणामुळे त्वचा अधिकच निस्तेज आणि कोरडी होऊन जाते. चेहऱ्यावर साचून राहिलेली घाण स्वच्छ न केल्यामुळे त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. चेहऱ्यावर वाढलेल्या मुरूम आणि पिंपल्समुळे त्वचेवर बारीक बारीक खड्डे तयार होऊ लागतात. चेहऱ्याच्या ओपन पोर्समध्ये साचून राहिलेल्या घाणीमुळे चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात. त्वचेवर आलेले पिंपल्स कमी करण्यासाठी बाजारातील महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. पण सतत चुकीचे स्किन केअर प्रॉडक्ट लावल्यामुळे त्वचेवरील ग्लो कमी होऊन जातो आणि त्वचा निस्तेज वाटू लागते.(फोटो सौजन्य – istock)
त्वचेवरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी कायमच स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेवरील टॅन कमी होतो. काळी आणि निस्तेज झालेली त्वचा स्वच्छ करण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला आयुर्वेदातील कोणत्या पदार्थाचा वापर करून त्वचेची काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली मुलतानी माती मागील अनेक वर्षांपासून वापरली जात आहे.
घरगुती पदार्थांचा वापर नियमित केल्यास त्वचेवरील हरवलेली चमक पुन्हा परत येईल. यासाठी मुलतानी माती, गुलाब पाणी, कॉफी आणि मधाचा वापर करावा. फेसपॅक तयार करताना सर्वप्रथम, वाटीमध्ये मुलतानी माती घेऊन त्यात मध, चमचाभर गुलाब पाणी आणि अर्धा चमचा कॉफी पावडर मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून १५ ते २० मिनिटं तसेच ठेवा. त्यानंतर हातांना पाणी लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी होण्यास मदत होईल.
मुलतानी मातीचा वापर मागील अनेक वर्षांपासून केला जात आहे. मुलतानी मातीच्या वापरामुळे त्वचा अतिशय उजळदार होण्यास मदत होते. याशिवाय त्वचेवर वाढलेले अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत होते. तसेच ओपन पोअर्स घट्ट होण्यास मदत होते. कॉफी पावडरमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे मुरुमे, ब्लॅकहेड्स आणि पिंपल्ससारख्या त्वचेच्या सर्वच समस्या बऱ्या होतात. मध त्वचा उजळदार करते. गुलाब पाण्याच्या वापरामुळे त्वचा हायड्रेट राहते. त्वचेवर वाढलेल्या मृत पेशी कमी करण्यासाठी नियमित हा फेसपॅक लावावा.