
ई-संजीवनीमुळे आरोग्यसेवा आणि नेत्रसेवा होणार अधिक सुलभ! ग्रामीण भागातील रुग्णांना मिळणार तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला
अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ‘ई-संजीवनी’ (eSanjeevani) ही राष्ट्रीय टेलीमेडिसिन सेवा आरोग्यसेवा अधिक सुलभ आणि कार्यक्षम बनवत आहे. या डिजिटल क्रांतीमुळे शहरी आणि ग्रामीण भागातील आरोग्यसेवेतील दरी कमी होत असून, रुग्णांना घरबसल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळणे शक्य झाले आहे。ई-संजीवनीमुळे आरोग्यसेवा व नेत्रसेवा कशी सुलभ झाली आहे याचा या क्षेत्राला कोणता लाभ होत आहे, याची प्रमुख वैशिष्ट्ये काय जाणून घेऊयात डॉ.विकास जैन, ग्रुप सीओओ, एएसजी आय हॉस्पिटल यांच्याकडून.(फोटो सौजन्य – istock)
देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत समान आरोग्यसेवा पोहोचवणे हे भारताच्या सार्वजनिक आरोग्य सेवेसमोर मोठे आव्हान आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत डिजिटल तंत्रज्ञानामुळे आरोग्यसेवा देण्याच्या पद्धतीत बदल होऊ लागला आहे. पूर्वी पुरेशी सेवा न मिळालेल्या लोकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे शक्य होऊ लागले आहे. भारत सरकारच्या माहितीनुसार ‘ई-संजीवनी’ या देशाच्या राष्ट्रीय टेलिमेडिसिन सेवेच्या माध्यमातून ३३.८ कोटींहून अधिक रुग्णांना सेवा देण्यात आली आहे.
टेलिमेडिसिन आणि डिजिटल आरोग्य प्लॅटफॉर्म – यांचा वाढता वापर हे या बदलामागील सर्वांत महत्त्वाचे कारण ठरले आहे. सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केलेला ‘ई-संजीवनी’ हा राष्ट्रीय टेलिमेडिसिन प्लॅटफॉर्म हा आज या प्रकारातील सर्वांत मोठ्या डिजिटल आरोग्य उपक्रमांपैकी एक बनला आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे हेल्थ अँड वेलनेस सेंटरच्या माध्यमातून डॉक्टरांना एकमेकांशी संवाद साधता येतो, तसेच ऑनलाइन ओपीडी सेवांद्वारे रुग्णांनाही डॉक्टरांशी थेट संपर्क साधण्याची सुविधा मिळते. सरकारी आकडेवारीनुसार ‘ई-संजीवनी प्लॅटफॉर्म’च्या माध्यमातून कोट्यवधी रुग्णांनी टेलीकन्सल्टेशन सुविधेचा फायदा घेतला आहे. यावरून डॉक्टर आणि रुग्ण दोघेही दूरस्थ पद्धतीने आरोग्यसेवा घेण्याबाबत अधिक सजग आणि सकारात्मक होत असल्याचे दिसून येते.
‘टेलिमेडिसिन’ सोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डेटावर आधारित तंत्रज्ञान – यांचाही आरोग्यसेवांमध्ये वापर वाढत आहे. वैद्यकीय प्रतिमा, रुग्णांच्या नोंदी आणि तपासणी अहवाल अशा मोठ्या प्रमाणातील वैद्यकीय माहितीचे विश्लेषण करून आजार ओळखण्यात एआय प्रणाली डॉक्टरांना अधिक चांगली मदत करू शकतात. मोठ्या डेटासेटवर प्रशिक्षित मशीन लर्निंग अल्गोरिदममुळे क्षयरोग, कर्करोग आणि हृदयविकार यांसारख्या आजारांशी संबंधित लक्षणे ओळखण्यास मदत होते. त्यामुळे आजारांचे लवकर निदान होण्यास आणि अधिक अचूक वैद्यकीय निर्णय घेण्यास डॉक्टरांना शक्य होते. एआय-आधारित नैदानिक साधनांमुळे तपासण्यांची क्षमता वाढू शकते आणि तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असलेल्या आरोग्य केंद्रांमध्ये तेथे उपलब्ध असलेल्या संसाधनांचा अधिक कार्यक्षम वापर करणे शक्य होऊ शकते, हे दिसून आलेले आहे.
डिजिटल परिवर्तनाचा नेत्रसेवा क्षेत्रालाही नव्या तंत्रज्ञानाचा मोठा लाभ – तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आणि तपासणी सुविधांतील कमतरता भरून काढण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावत आहे. प्रशिक्षित तंत्रज्ञ किंवा आरोग्य कर्मचारी हे स्थानिक आरोग्य केंद्रांमध्ये रेटिनाचे फोटो घेऊन ते दूरस्थ पद्धतीने नेत्र तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठवू शकता. नेत्रतज्ज्ञ सहज उपलब्ध नसलेल्या भागांमध्येही ‘टेलिऑफ्थॅल्मोलॉजी’ च्या या पद्धतीमुळे डोळ्यांच्या आजारांची लवकर तपासणी करणे शक्य होत आहे. तसेच ग्रामीण आणि वंचित भागांतील लोकांना तज्ज्ञ नेत्रसेवेचा लाभ मिळू शकत आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे ‘एआय-सक्षम रेटिनल इमेजिंग’ प्रणाली – च्या मदतीने ‘डायबेटिक रेटिनोपॅथी’ सारख्या आजारांची सुरुवातीची लक्षणे लवकर ओळखता येतात. रेटिनाच्या प्रतिमांचा अभ्यास करून डोळ्यांतील संभाव्य समस्या ओळखण्यात मशीन लर्निंग तंत्रज्ञान हे डॉक्टरांना मदत करू शकते. त्यामुळे कोणत्या रुग्णांना पुढील तज्ज्ञ तपासणीची गरज आहे, हे लवकर समजू शकते. या तंत्रज्ञानामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही डोळ्यांची तपासणी करणे शक्य होते. गंभीर उपचारांची गरज असलेल्या रुग्णांवर नेत्रतज्ज्ञ अधिक लक्ष केंद्रित करू शकतात.
Ans: ई-संजीवनी ही भारत सरकारची टेलिमेडिसिन सेवा आहे, ज्याद्वारे रुग्णांना ऑनलाइन माध्यमातून डॉक्टरांचा सल्ला घेता येतो.
Ans: डोळ्यांशी संबंधित प्राथमिक समस्या, तपासणीसाठी मार्गदर्शन आणि तज्ज्ञ नेत्ररोगतज्ज्ञांचा सल्ला दूरस्थ पद्धतीने मिळू शकतो.
Ans: रुग्णांना हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष जाण्याची गरज कमी होते. मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून डॉक्टरांशी संपर्क साधून वैद्यकीय सल्ला मिळवता येतो.