
Easy Milk Peda Recipe (फोटो सौजन्य- सोशलमीडिया))
दिवाळी आली की घरात सगळीकडे आनंद असतो. लाईट्स, रांगोळी, फटाके आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फराळ. दिवाळीत प्रत्येकाच्या घरात काहीतरी गोडधोड बनतंच. पण आजकाल बाजारातून पेढे आणायचे म्हटले की मनात भीती असते. मावा खरा आहे का, साखर जास्त आहे का, भेसळ तर नाही ना? या विचाराने गोड खाण्याची मजा निघून जाते. Easy Milk Peda Recipe:
मग यावर उपाय काय? तर उपाय एकदम सोपा आहे. यंदा दिवाळीत बाहेरचे पेढे आणण्याऐवजी घरच्याच दुधाचे पेढे बनवा. अगदी दुकानात मिळतात तसेच मऊ, तोंडात टाकताच विरघळणारे. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे यासाठी जास्त सामान पण लागत नाही. फक्त 3-4 वस्तूंमध्ये तुमचे पेढे तयार. Easy Milk Peda Recipe:
हे पेढे बनवायला तुम्हाला दुकानात पळायची गरज नाही. सगळं सामान घरातच मिळेल.
मिल्क पावडर – 2 मोठे कप
दूध – 1 कप, साधं दूध चालेल
साजूक तूप – 2 ते 3 चमचे
पिठी साखर – अर्धा कप, गोड किती हवंय त्यानुसार कमी जास्त करा
थोडी वेलची पूड आणि सजावटीसाठी पिस्त्याचे काप
पहिली स्टेप – मिश्रण तयार करा
एक जाड बुडाची कढई किंवा नॉनस्टिक पॅन घ्या. गॅस चालू करून त्यात एक कप दूध टाका. त्यातच 2 कप मिल्क पावडर टाका आणि 2 चमचे तूप पण टाका. आता चमच्याने सगळं एकत्र हलवून घ्या. अजिबात गुठळ्या राहता कामा नयेत. एकदम प्लेन, गुळगुळीत पेस्ट बनली पाहिजे.
दुसरी स्टेप – शिजवणे
आता गॅस एकदम बारीक ठेवा. हाच सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मोठ्या आचेवर करू नका नाहीतर मिश्रण जळेल. बारीक गॅसवर चमच्याने सारखं हलवत रहा. थोड्या वेळातच ते मिश्रण घट्ट होऊ लागेल. सुरुवातीला पातळ वाटेल पण हळूहळू त्याला माव्यासारखा आकार येईल आणि ते कढई सोडायला लागेल. जेव्हा सगळं मिश्रण एका गोळ्याच्या रूपात एकत्र येईल, तेव्हा समजायचं की झालं. आता गॅस बंद करा.
तिसरी स्टेप – पेढ्यांना आकार देणे
मिश्रण थोडं थंड होऊ द्या, पण पूर्ण थंड करू नका. कोमट असतानाच त्यात अर्धा कप पिठी साखर आणि थोडी वेलची पूड टाका. हाताने चांगलं मळून घ्या. आता हाताला थोडं तूप लावा म्हणजे चिकटणार नाही. छोटा गोळा घ्या आणि दोन्ही तळहातामध्ये गोल फिरवा. नंतर थोडं दाबून चपटं करा आणि मधोमध अंगठ्याने हलकं दाबा. झाला तुमचा पेढा तयार. असेच सगळे पेढे बनवून घ्या.
शेवटची स्टेप – सजावट
तयार झालेल्या पेढ्यांवर वरून थोडे पिस्त्याचे बारीक काप किंवा केशरच्या दोन-तीन काड्या लावा. दिसायला पण दुकानासारखे भारी दिसतील.झाले, तुमचे घरचे शुद्ध आणि स्वादिष्ट दुध पेढे तयार. हे पेढे तुम्ही 4-5 दिवस आरामात ठेवू शकता. फ्रिजमध्ये तर आठवडाभर टिकतात.या दिवाळीत बाजारच्या भेसळयुक्त मिठाईला नकार द्या आणि घरच्यांना स्वतःच्या हाताने बनवलेले प्रेमाचे आणि शुद्ध पेढे खाऊ घाला. पाहुण्यांना पण द्यायला एकदम भारी पर्याय आहे.