
मूत्रपिंडांचा आजार जीवावर बेतणारा, महिलांनी काय खबरदारी घ्यावी? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला
पुणे : कोणतीही स्पष्ट लक्षणे न दिसता अनेकदा मूत्रपिंडांचे आजार विकसित होतात. त्यामुळे अनेक महिलांमध्ये उशिरा निदान होते आणि तोपर्यंत आजार लक्षणीय प्रमाणात वाढलेला असतो. शरीरातील विषारी द्रव्ये काढून टाकणे आणि अंतर्गत संतुलन राखणे यामध्ये मूत्रपिंडांची महत्त्वाची भूमिका असूनही, नियमित होणाऱ्या आरोग्य चर्चांमध्ये मूत्रपिंडांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. जागतिक स्तरावर, दीर्घकालीन मूत्रपिंड आजार (सिकेडी) सुमारे ८५ कोटी लोकांना प्रभावित करत आहे. आजारात शांतपणे होत असलेली वाढ हे या आजाराचे आव्हान आहे. प्रारंभिक लक्षणांमध्ये सर्वसाधारण अशक्तपणा, लवकर थकवा येणे, रात्री वारंवार लघवीसाठी उठणे (नॉक्ट्युरिया), लघवीत फेस येणे, पायांवर सौम्य सूज, रक्ताल्पता (अॅनिमिया) इत्यादींचा समावेश होतो. मूत्रपिंडांच्या आजारांची लक्षणे अनेकदा दुर्लक्षित केली जातात.
डॉ. मनीषकुमार माळी सांगतात की, हा आजार “सायलेंट किलर” म्हणून ओळखला जातो कारण सुरुवातीची लक्षणे अस्पष्ट असतात. महिलांना थकवा, पाय किंवा चेहऱ्यावर सूज, सौम्य पाठदुखी अशी लक्षणे दिसू शकतात जी अनेकदा ताण, शरीरातील पाण्याची कमतरता, हार्मोनल बदल, व्यस्त जीवनशैली किंवा चुकीच्या बसण्याच्या सवयीमुळे (पोस्चर) असल्याचे समजले जाते. सततचा आणि कारण न सापडणारा अॅनिमिया हा मूत्रपिंडाच्या आजाराचा इशारा असू शकतो आणि तो नेहमीच लोह किंवा व्हिटॅमिन बिटवेल (B12) च्या कमतरतेमुळेच असेल असेही नाही.
इशारे देणारी लक्षणे दुर्लक्षित करण्याची ही प्रवृत्ती निदान उशिरा होण्यास कारणीभूत ठरते. अनेक वेळा महिलांकडून लक्षणे गंभीर झाल्यावरच वैद्यकीय मदत घेतली जाते, तोपर्यंत मूत्रपिंडांचे कार्य मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेले असते. त्यामुळे लघवीची तपासणी आणि मूत्रपिंड कार्य चाचण्या यांसारख्या नियमित आरोग्य तपासण्या लवकर निदानासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.
महिलांना शारीरिक रचनेमुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका अधिक असतो. बहुतेक ‘यूटीआय’ वर सहज उपचार करता येतात. परंतु वारंवार होणारा किंवा उपचार न केलेला संसर्ग मूत्रपिंडांपर्यंत पसरून गंभीर गुंतागुंत निर्माण करू शकतो. सतत लघवीशी संबंधित त्रास हा किडनी स्टोन्सचा (मुतखडा) याचा इशारा असू शकतो. जो शरीरातील पाण्याची कमतरता, आहारातील सवयी किंवा मेटाबॉलिक समस्यांमुळे निर्माण होतो. स्टोन्समुळे ‘यूटीआय’सारखीच लक्षणे दिसतात. यामध्ये लघवी करताना जळजळ, पोटदुखी किंवा वारंवार लघवीला लागणे म्हणून अल्ट्रासाऊंड किंवा सीटी स्कॅनसारख्या तपासण्या केल्याशिवाय ते ओळखले जात नाहीत. वारंवार होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करणे किंवा स्वतःच औषधे घेणे यामुळे दीर्घकालीन मूत्रपिंडांच्या नुकसानीचा धोका वाढतो.
आहार हा मूत्रपिंडांच्या आरोग्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. मूत्रपिंडे विषारी पदार्थ गाळून टाकतात आणि शरीरातील द्रव व खनिजांचे संतुलन राखतात. अतिरिक्त मीठ, प्रक्रिया केलेले अन्न, साखरयुक्त पेये आणि जास्त प्रमाणात लाल मांसाचे सेवन मूत्रपिंडांवर ताण आणते आणि उच्च रक्तदाब व मधुमेहाचा धोका वाढवते. ते मूत्रपिंडांच्या आजारांची प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे अशा पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवणे गरजेचे आहे.
डायलिसिस घेणाऱ्या रुग्णांमध्ये आहाराबाबत अनेक गैरसमज असतात. एक सामान्य गैरसमज म्हणजे प्रथिने पूर्णपणे टाळावीत; पण प्रत्यक्षात डायलिसिसमुळे प्रथिनांचे नुकसान होते, त्यामुळे स्नायूंची ताकद आणि एकूण आरोग्य टिकवण्यासाठी पुरेशा प्रमाणात प्रथिने आवश्यक असतात. आणखी एक गैरसमज म्हणजे सर्व फळे आणि द्रव पदार्थ पूर्णपणे टाळावेत. प्रत्यक्षात, पोटॅशियमची पातळी, लघवीचे प्रमाण आणि डायलिसिसचा प्रकार यानुसार आहार वैयक्तिकरित्या ठरवला जातो, त्यामुळे संतुलित पोषण राखता येते.
मूत्रपिंडांचे आरोग्य जपण्यासाठी जागरूकता आणि सक्रिय काळजी घेणे आवश्यक आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, वारंवार यूटीआय किंवा किडनी स्टोन्स असलेल्या महिलांनी सिरम क्रिएटिनिन, लघवी तपासणी आणि अंदाजित ग्लोमेर्युलर फिल्ट्रेशन रेट (eGFR) यांसारख्या नियमित तपासण्या करणे गरजेचे आहे. सुरुवातीच्या लक्षणांकडे लक्ष देणे आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे यामुळे मूत्रपिंडांच्या समस्या लवकर ओळखता येतात आणि दीर्घकालीन गुंतागुंत टाळता येते.