
जागतिक डोके व मान कर्करोग दिनानिमित्त HNCII कडून कर्करोगात विलंब हाच खरा घातक जनजागृती मोहिमेची सुरुवात
मुंबई: जागतिक डोके व मान कर्करोग दिनाच्या पार्श्वभूमीवर, हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (HNCII) ने “कर्करोगात विलंब हाच खरा घातक” या प्रभावी संदेशावर आधारित जनजागृती मोहिमेची घोषणा केली.भारतामध्ये डोके व मान कर्करोग हा सर्वाधिक आढळणाऱ्या कर्करोगांपैकी एक असून, देशातील एकूण कर्करोगांपैकी जवळपास 30% प्रकरणे या प्रकारातील आहेत. यातील बहुतांश प्रकरणे तंबाखूच्या सेवनाशी संबंधित आहेत. हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात ओळखला गेल्यास उपचार अत्यंत प्रभावी ठरू शकतात. मात्र, सुमारे 70% रुग्ण प्रगत अवस्थेत उपचारासाठी येत असल्याने उपचार अधिक गुंतागुंतीचे होतात, परिणामकारकता कमी होते आणि उपचारांचा खर्चही लक्षणीयरीत्या वाढतो.
या मोहिमेचा उद्देश नागरिकांना कर्करोगाची संभाव्य लक्षणे ओळखण्यासाठी प्रोत्साहित करणे, वेळ न दवडता वैद्यकीय सल्ला घेणे, आवश्यक तपासण्या करून घेणे आणि कर्करोगाचे निदान झाल्यास तातडीने उपचार सुरू करणे हा आहे.या उपक्रमाची घोषणा HNCII चे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. सुलतान ए. प्रधान यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या माध्यम कार्यशाळेत करण्यात आली. यावेळी त्यांनी कर्करोगाच्या संभाव्य लक्षणांकडे पाहण्याचा आणि त्यावर प्रतिसाद देण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज अधोरेखित केली.
तोंडातील दीर्घकाळ न भरून येणारी जखम, कोणतीही वेदना नसलेली किंवा अस्पष्ट गाठ, सतत गिळताना होणारा त्रास, आवाजातील बदल किंवा इतर कोणतेही असामान्य लक्षण दुर्लक्षित करू नयेत किंवा दीर्घकाळ तसेच राहू देऊ नयेत. अशा लक्षणांची त्वरित वैद्यकीय तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, कर्करोगाची शंका आल्यास किंवा निदान झाल्यानंतर आवश्यक तपासण्या पूर्ण करण्यात किंवा उपचार सुरू करण्यात होणारा विलंबही रुग्णाच्या उपचारांच्या परिणामांवर गंभीर परिणाम करू शकतो.
या उपक्रमाबाबत बोलताना HNCII चे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. सुलतान ए. प्रधान म्हणाले, “कर्करोगाच्या उपचारांमध्ये आपण मोठी प्रगती केली आहे. मात्र, या प्रगतीचा लाभ रुग्ण वेळेत आमच्यापर्यंत पोहोचल्यासच होऊ शकतो. अनेकदा लोक लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, ती आपोआप बरी होतील अशी वाट पाहतात, डॉक्टरांकडे जाणे पुढे ढकलतात किंवा निदान झाल्यानंतरही उपचार सुरू करण्यास विलंब करतात. प्रत्येक नागरिकाला आमचा साधा संदेश आहे – काहीतरी असामान्य वाटत असेल तर त्वरित तपासणी करून घ्या. कर्करोगात विलंब हाच खरा घातक आहे.”ही जनजागृती अधिक व्यापक स्तरावर पोहोचवण्यासाठी HNCII ने कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA), इंडियन कॅन्सर सोसायटी (ICS), दंतवैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच इतर समविचारी संस्थांशी भागीदारी केली आहे.
या भागीदारीबाबत डॉ. प्रधान म्हणाले, “CPAA आणि ICS सारख्या स्वयंसेवी संस्थांचे समाजातील तळागाळापर्यंत मजबूत जाळे आहे आणि त्या प्रभावीपणे जनजागृती करू शकतात. तोंडाच्या कर्करोगाची सुरुवातीची चिन्हे अनेकदा नियमित दंत तपासणीदरम्यान प्रथम दिसून येतात. त्यामुळे दंतवैद्यांची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची आहे. अशा सर्व भागीदारांना एकत्र आणल्यास जनजागृती, लवकर निदान आणि वेळेत योग्य तज्ज्ञांकडे रुग्णांना पाठविण्यासाठी आवश्यक असे प्रभावी जाळे निर्माण होईल.”
जनजागृती कार्यक्रम, समाजाभिमुख उपक्रम, माहितीपर साहित्य, डिजिटल माध्यमांद्वारे संवाद आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांशी समन्वय यांच्या माध्यमातून “कर्करोगात विलंब हाच खरा घातक” हा संदेश देशभरातील प्रत्येक घरापर्यंत आणि समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवण्याचा HNCII चा प्रयत्न आहे. दीर्घकालीन उद्दिष्ट म्हणजे आज ज्या पद्धतीने जवळपास 70% रुग्ण प्रगत अवस्थेत उपचारासाठी येतात, ती परिस्थिती बदलून बहुसंख्य रुग्णांचे निदान आणि उपचार सुरुवातीच्या टप्प्यातच होणे.जागतिक डोके व मान कर्करोग दिनानिमित्त HNCII नागरिक आणि आरोग्य क्षेत्रातील सर्वांना एकच आवाहन करत आहे.
हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (HNCII) ही कॅनकेअर ट्रस्ट अंतर्गत कार्यरत असलेली भारतातील डोके व मान कर्करोगासाठी समर्पित पहिली आणि एकमेव सुपर-स्पेशालिटी रुग्णालय संस्था आहे. प्रख्यात शल्य कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुलतान ए. प्रधान यांनी स्थापन केलेली ही १०० खाटांची संस्था ऑगस्ट २०२३ मध्ये मुंबई येथे सुरू झाली. येथे शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन ऑन्कोलॉजी, निदान सेवा, पुनर्वसन, वेलनेस आणि पॅलिएटिव्ह केअर अशा सर्वसमावेशक कर्करोग उपचार सुविधा एकाच छताखाली उपलब्ध आहेत.
HNCII मध्ये डोके व मान कर्करोग, तोंडाचा कर्करोग, थायरॉईड कर्करोग, स्कल बेस, मेंदू आणि मणक्यांच्या ट्युमर्सवर विशेष उपचार केले जातात. तसेच प्रतिबंधात्मक कर्करोग उपचार आणि लवकर निदान यावरही संस्थेचा विशेष भर आहे. अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि बहुविद्याशाखीय तज्ज्ञांच्या टीमच्या सहाय्याने HNCII भारतात सर्वांसाठी सुलभ, रुग्णकेंद्रित आणि जागतिक दर्जाची कर्करोग उपचार सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे.
Ans: दरवर्षी २७ जुलै रोजी जागतिक डोके व मान कर्करोग दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश या कर्करोगाबाबत जनजागृती करणे आणि लवकर निदानाचे महत्त्व पटवून देणे हा आहे.
Ans: तोंडात न भरून येणारे व्रण, सतत घसा दुखणे, आवाजात बदल, गिळताना त्रास होणे, मानेला गाठ येणे, तोंडातून रक्त येणे किंवा दीर्घकाळ कान दुखणे ही काही सामान्य लक्षणे असू शकतात.
Ans: या मोहिमेचा उद्देश लक्षणे दिसताच तपासणी करून कर्करोगाचे लवकर निदान आणि वेळेवर उपचार सुरू करण्याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा आहे.